मुंबई : भाजपने बाबरी मशिदीच्या मुद्द्याचा वापर करत सत्ता मिळवली आणि त्या गादीवर आता कुंभकर्णासारखे लोळत पडले आहेत, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला लक्ष्य केले. ते सोमवारी पंढरपुरातील जाहीर सभेत बोलत होते. यावेळी त्यांनी दुष्काळ, राम मंदिर, राफेल घोटाळा आणि पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या निकालावरून भाजपवर चौफेर हल्ला चढवला. तसेच आगामी निवडणुकीत भाजपशी युती करायची की नाही, याचा निर्णय जनताच घेईल, असेही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. राम मंदिराबाबत पंतप्रधानांनी लोकसभेत मतदान घेऊन दाखवावे की, एनडीएतील किती पक्ष याला पाठिंबा देतात. ३० वर्षांपूर्वी हा मुद्दा कोर्टात जाणार हे तुम्हाला माहिती होतं. मग त्यावेळी हे कळलं नाही का? मंदिराच्या मुद्दावरुन सत्ता बळकावल्या हिंसाचार केला आणि त्यापासूनच दूर पळताय. भाजप केवळ अयोध्येत राम मंदिर होतं, असेल आणि राहील, अशी भाषा करते. मात्र, मंदिर प्रत्यक्षात दिसणार कधी हा प्रश्न मी त्यांना विचारू इच्छितो. अन्यथा भाजपच्याबाबतीत 'बाबरी पाडली, मी लाभार्थी', असे म्हणावे लागेल, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.
ठळक मुद्दे
* देशातला हिंदू भोळा आहे, बावळट नाही- उद्धव ठाकरे
* युती करायची की नाही, हे आम्ही ठरवलंय, आता पुढचा निर्णय जनतेचा- उद्धव ठाकरे
* ज्यांनी जनतेचं वाकडं केलं, त्या सरकारचं वाकडं करा, हेच साकडं विठ्ठलाला घातलं- उद्धव ठाकरे
* अनुभव नसलेल्या कंपनीला राफेल विमाननिर्मितीचं कंत्राट दिले जाते, तर गोळ्या तयार करण्याचे काम महिला बचतगटांना द्या- उद्धव ठाकरे
* शेतकऱ्यांसाठी सरकारला धारेवर धरणारच, हिंमत असेल तर शिक्षा करा- उद्धव ठाकरे
* पीकविमा योजनेत राफेल व्यवहारासारखा घोटाळा- उद्धव ठाकरे
* कर्जमाफी आणि पिकविमा योजनेची नुकसान भरपाई किती जणांना मिळाली?- उद्धव ठाकरे
* जानेवारी महिन्यात उद्धव ठाकरे दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करणार
* दुष्काळाची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाची पाहणी बुलेट ट्रेनसारखी वेगवान; उद्धव ठाकरेंचा दौरा- उद्धव ठाकरे
मी पंतप्रधानांसारख्या शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या थापा मारत नाही- उद्धव ठाकरे
* तेलंगणाने राष्ट्रीय पक्षांची मस्ती उतरवली- उद्धव ठाकरे
* जनतेने पर्यायाचा विचार न करता पहिले घाण साफ केली- उद्धव ठाकरे
* पांडुरंग गोरगरिब शिवसैनिकांचा देवः उद्धव ठाकरे
* पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांनी भाजपचा 'आम्ही जगज्जेते आहोत' हा तोरा उतरवला- उद्धव ठाकरे
* मराठा समाजाप्रमाणे धनगर, महादेव कोळी समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी शिवसेना पाठिंबा देणार- उद्धव ठाकरे
* भगवे वस्त्र परिधान करून उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे सभास्थळी दाखल
* महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात कर्जमाफी का होऊ शकत नाही?- तानाजी सावंत
* उद्धव ठाकरे यांचे सभास्थानी आगमन, थोड्याच वेळात भाषणाला सुरुवात
* सत्तेतून बाहेर पडा, आता युती नको; शिवसैनिकांची मागणी
* उद्धव ठाकरे स्वबळाचा नारा देणार का हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून युतीसाठी तयार होणार?
* थोड्याचवेळात जाहीर सभेला सुरुवात; उद्धव ठाकरे काय बोलणार, याकडे लक्ष.
* शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब घेतले विठुरायाचे दर्शन
* उद्धव ठाकरे पंढरपुरात दाखल
* उद्धव ठाकरे सोलापूर विमानतळावर दाखल