Ramtek LokSabha Constituency : रामटेक... प्रभू श्रीरामच्या पावन स्पर्शाने पवित्र झालेली भूमी... इथल्या उंच डोंगरावर प्रभू श्रीरामांचं 600 वर्षं प्राचीन मंदिर आहे. कवीकुलगुरू कालिदास यांनी मेघदूत हे संस्कृत अभिजात काव्य इथंच लिहिल्याचं सांगितलं जातं. लीळाचरित्राची रचना करणाऱ्या चक्रधरस्वामींचं मंदिरही याच परिसरात आहे. तोतलाडोह धरण, नगरधनचा किल्ला ही रामटेकची वैशिष्ट्यं. इथं मनसर परिसरात बौद्ध संस्कृतीचे अवशेषही आहेत. उपराजधानी नागपूरपासून अवघ्या 50 किमी अंतरावर असलेला हा प्रदेश, मात्र समस्या रामटेकला घट्ट विळखा मारून बसल्यात.
रामटेक 'रामभरोसे'
वनसंपदेनं नटलेलं रामटेक... मात्र इथं पर्यटनाच्या दृष्टीनं काहीच चालना नाही. संत्रा उत्पादक शेतकरी अडचणीत आहेत. तरुणांना रोजगाराच्या संधी नाहीत, त्यामुळे अनेक तरुणांना पुणे किंवा मुंबईकडे रवाना व्हावं लागतं. पर्यटनाच्या उपाय योजनांबाबत आश्वानस दिली गेली. मात्र, रामटेक रामभरोसेच राहिलं.
रामटेकचं राजकीय गणित
एकेकाळी रामटेक हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव १९८४ आणि १९८९ मध्ये दोनवेळा रामटेकमधून खासदार म्हणून विजयी झाले. मात्र रामटेक हा शिवसेनेचा गड बनलाय. 2009 मध्ये काँग्रेसच्या मुकुल वासनिकांनी शिवसेनेच्या कृपाल तुमानेंचा 16 हजार मतांनी पराभव केला. 2014 मध्ये शिवसेनेच्या कृपाल तुमानेंनी या पराभवाचा वचपा काढताना वासनिकांना पावणे दोन लाख मतांनी हरवलं. 2019 मध्ये तुमाने यांनी दुसऱ्यांदा खासदार बनताना काँग्रेसच्या किशोर गजभियेंचा सव्वा लाख मतांनी पाडाव केला. विधानसभेचा विचार केला तर इथं भाजपचे 2, काँग्रेसचे 2, राष्ट्रवादीचा 1 आणि शिवसेना समर्थक 1 अपक्ष आमदार आहे.
शिवसेनेतल्या फुटीनंतर रामटेकचे विद्यमान खासदार कृपाल तुमाने यांनी शिंदे गटात प्रवेश केला. मात्र त्यांच्या विरोधात नाराजी असल्यानं त्यांचं तिकीट कापण्यात आलं. त्यांच्याऐवजी ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमधून उमरेडचे आमदार राजू पारवेंना आयात करण्यात आलं. त्यांच्या हाती शिवसेनेचा धनुष्यबाण देऊन निवडणुकीच्या रणांगणात उतरवण्यात आलं. काँग्रेसमधून आपल्या मुलाला तिकीट मिळावं, यासाठी नितीन राऊतांनी फिल्डिंग लावली. मात्र, हायकमांडनं सुनील केदार यांच्या मर्जीतल्या रश्मी बर्वेंना उमेदवारी दिली. त्यांचं दुर्दैव असं की, जात पडताळणी समितीनं त्यांचं जात प्रमाणपत्र रद्द केलं. परिणामी त्यांचा उमेदवारी अर्जच बाद करण्यात आला. त्यांच्या जागी आता पती श्यामकुमार बर्वे काँग्रेसकडून लढत आहेत.
गेल्यावेळी काँग्रेसमधून निवडणूक लढवणाऱ्या किशोर गजभियेंनी उमेदवारी न मिळाल्यानं बंडखोरी केली. वंचित बहुजन आघाडीनंही त्यांना पाठिंबा दिल्यानं अपक्ष किशोर गजभियेंचं बळ वाढलंय आणि काँग्रेसची डोकेदुखी वाढली. रामटेकमध्ये काँग्रेसवाल्यांमध्येच तिरंगी लढत रंगणार आहे. काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे विरुद्ध काँग्रेसमधून आयात केलेले शिवसेनेचे राजू पारवे विरुद्ध वंचितच्या पाठिंब्यावर नशीब आजमावणारे काँग्रेस बंडखोर किशोर गजभिये असा हा सामना आहे. ओबीसी आणि दलित मतदार नेमकं कुणाच्या पारड्यात वजन टाकणार, यावर हार-जीतचं गणित अवलंबून असणार आहे.