बलात्कार केलेल्या नराधमांना पोलिसांकडे देण्याऐवजी जातपंचायतीकडून शुद्धीकरणाचा घाट

२९ ऑक्टोबरला देशाच्या विविध भागातून पंच आले आणि या तिघांना शुद्ध करुन घेण्याची ही तथाकथित प्रक्रिया पार पडली.

Updated: Feb 4, 2019, 11:21 PM IST
बलात्कार केलेल्या नराधमांना पोलिसांकडे देण्याऐवजी जातपंचायतीकडून शुद्धीकरणाचा घाट

नागपूर: गुन्हेगारी घटनांमुळे नागपूर दिवसेंदिवस कुख्यात होत चालले असतानाच शहरातील आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील वाडी परिसरात गतीमंद मुलीवर बलात्कार करणाऱ्या दोन आरोपींना ताब्यात देण्याऐवजी समाजातील लोकांनी शुद्धीकरण करून या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा सर्व प्रकार उघडकीस आल्यानंतर आरोपींनी पलायन केले आहे. नागपूरच्या वाडी परिसरात राहणाऱ्या २५ वर्षांच्या गतिमंद मुलीवर तिच्याच नात्यातल्या वेंकटेश पसपरेटी आणि रामू उर्फ गोपी या दोघा नराधमांनी बलात्कार केला. चार  महिन्यानंतर मुलगी गरोदर राहिली तेव्हा हा प्रकार उजेडात आला. यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे दाद मागायची ठरवली तेव्हा समाजातील काही प्रतिष्ठित लोकांनी हस्तक्षेप करत यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. दोन्ही आरोपी हे समाजातील प्रतिष्ठित लोकांचे नातेवाईक आहेत. त्यामुळे या लोकांनी हस्तक्षेप केला आणि कुटुंबीयांना पोलिसांकडे तक्रार देण्यापासून थांबवले. पंचायत बसवू आणि प्रकरण सोडवू असे सांगत त्यांनी मुलीच्या नातेवाईकांना रोखून धरले. २९ ऑक्टोबरला देशाच्या विविध भागातून पंच आले आणि या तिघांना शुद्ध करुन घेण्याची ही तथाकथित प्रक्रिया पार पडली.

आरोपी वेंकटेश आणि रामू यांच्यासह पीडित तरुणी आणि रामूची पत्नी या चौघांना सुकलेल्या फांद्यांना आग लावून त्या जळत्या फांद्यांच्या खालून ७ फेऱ्या मारायला लावण्यात आल्या. यानंतर एका महिन्यात तुमच्या मुलीचे लग्न लावून देऊ, असे आश्वासन देऊन पंच परतले. मात्र, यानंतर दोन्ही आरोपी फरार झाले. त्यामुळे मुलीच्या कुटुंबीयांनी अखेर पोलिसांत तक्रार केली. 

यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाईला सुरुवात केली. दोन्ही आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची पथके तेलंगणा, उस्मानाबाद, सोलापूर परिसरात रवाना झाली आहेत. दुर्दैवी म्हणजे  शुद्धीकरणाच्या घोळात पीडित मुलगी आता आठ महिन्यांची गरोदर आहे. आता तिचा गर्भपात होणेही शक्य नाही. त्यामुळे या मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे.