रत्नागिरी : कोकण किनारपट्टीवर गेले काही महिने मत्स्य दुष्काळ स्थिती कायम असताना कोकण किनारपट्टीसह देशाच्या पश्चिम किनारापट्टीवर १ जून ते ३१ जुलै २०१९ अशी ६१ दिवस मासेमारीवर बंदी असणार आहे. दोन महिने मासेमारी बंद राहणार असल्याने मच्छिमार बांधवानी समुद्रातील मासेमारी नौका किनाऱ्यावर सुरक्षित नांगरून ठेवल्या आहेत.
दरम्यान, मासेमारी बंदी कालावधीत यांत्रिक मासेमारी बंद राहणार आहे. घटते मत्स्योत्पादन आणि राज्या-राज्यातील सागरी हद्दीमध्ये घुसखोरीच्या वाढत्या तक्रारींमुळे केंद्र सरकारने गेल्या काही वर्षात पश्चिम किनाऱ्यावर १ जून ते ३१ जुलैपर्यंत समान मासेमारी बंदी कालावधी लागू केला.
पावसाळ्यात मासे अंडी घालण्यासाठी किनाऱ्यालगत येतात. माशांच्या या प्रजनन कालावधीत अंड्यांवरील मासे पकडले गेल्यास मोठ्या प्रमाणात मत्स्यबीजाचा नाश होतो. हे सर्व टाळण्यासाठी शासनाकडून बंदी कालावधी लागू करण्यात येतो. कोकण कोणारपट्टीवर अद्याप मान्सूनचे आगमन झाले नसले तरी मच्छीमारांना १ जून पासून मासेमारी बंदी पाळणे बंधनकारक आहे.