मुंबई : राज्यात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मुंबई आणि ठाण्यात तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता असून हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. मुंबई आणि उपनगरांमध्ये आज सकाळपासूनच पावसाचा जोर पाहिला मिळतोय. ( Red alert of Heavy Rain in Maharashtra state )
राज्यात सर्वदूर मान्सूनची बरसात होतेय. विदर्भातही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे बुलढाणा जिल्ह्यात काल संध्याकाळी मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे नदी नाले दुथडी भरून वाहू लागलेत. तर मराठवाड्यातही पावसाने जोर पकडलाय. कोकण आणि पाऊस हे जुनं नातं आहे. रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर तालुक्यात सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. अर्जुना आणि कोदवली नदयांना पूर आलाय. तर चिपळूण, गुहागर तालुक्यामध्येही मुसळधार पावसामुळे सखल भागांमध्ये पाणी शिरलंय.
कोल्हापूर जिल्ह्याला गेल्या 2 दिवसांपासून धुवांधार पावसानं झोडपून काढलंय. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच नद्यांच्या पाणीपातळी मोठ्या प्रमाणात वाढ झालीय. तर अनेक ठिकाणी भराव टाकलेले रस्ते देखील वाहून गेलेत. पंचगंगा नदीवर असणऱ्या राजाराम बंधाऱ्यासह जिल्ह्यातील तब्बल ५५ बंधारे पाण्याखाली गेलेत. गडहिंग्लज तालुक्यातील हिरण्यकेशी नदीवरील जरळी, ऐनापूर, निलजी, नांगणुर हे बंधारे अवघ्या 12 तासात पाण्याखाली गेले आहेत. जिल्ह्यातील माजगाव जवळ भराव टाकून तयार केलेला पर्यायी रस्ता नदीच्या पाण्यामुळे वाहून गेलाय, त्यामुळे कोल्हापूर - गारगोटी हा रस्ता बंद झालाय. हिरण्यकेशी नदीवरील भडगाव पुलावर नदीच पाणी आल्याने गडहिंग्लज- चंदगड हा राज्यमार्गही बंध झालाय.
दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुण्यातही पावसाने दमदार कमबॅक केलंय. शहरातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे. पावसामुळे शहरात गारवा निर्माण झाला आहे.
हवामान विभागाने यंदा सरासरीपेक्षाही अधिक पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पावसाच्या हजेरीने राज्यातील बळीराजा सुखावला आहे.