Reliance AGM 2023: रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची 46 वी वार्षिक सर्वसाधारण बैठक आज पार पडली. यावेळी मुकेश अंबानी यांनी बैठकीला संबोधित करताना भारतामध्ये जगाचं नेतृत्व करण्याची क्षमता असून भारत ना थांबतो, ना खचतो, ना हरतो असं म्हटलं. मुकेश अंबानी यांनी भाषणाच्या सुरुवातीला चांद्रयान-3 च्या यशाचाही उल्लेख केला. नवीन रिलायन्स भारताच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देण्यासाठी कटिबद्ध असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं. तसंच रिलायन्सच्या संचालक मंडळात ईशा, आकाश आणि अनंत अंबानी यांचा समावेश करण्यात येणार आहे. नीता अंबानी बोर्डातून बाहेर पडणार आहेत.
वार्षिक सर्वसाधारण बैठकीत मुकेश अंबानी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावर केलेल्या भाषणाचा उल्लेख करत संबोधन करण्यास सुरुवात केली. मुकेश अंबानी यांनी यावेळी देश वेगाने आर्थिक प्रगती करत असून, 2047 पर्यंत भारत पूर्णपणे विकसित देश होईल असा विश्वास व्यक्त केला.
Jio 5G ऑक्टोबरच्या अखेरीस जारी केलं जाईल आणि डिसेंबर 2023 पर्यंत ते देशभरात आणले जाईल असं मुकेश अंबानी यांनी सांगितलं आहे. Jio ची देशात 85 टक्के 5G सेवा आहे, ही एक मोठी उपलब्धी असल्याचंही ते म्हणाले.
#WATCH | "Jio AirFibre to launch on Ganesh Chaturthi- September 19," says Reliance Industries chairman Mukesh Ambani pic.twitter.com/03OZJbt4Ys
— ANI (@ANI) August 28, 2023
मुकेश अंबानी यांनी सांगितलं की, रिलायन्स जिओसाठी 1 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचं लक्ष्य ठेवलं आहे. Jio 5G चा विस्तार जगात सर्वात वेगाने करणारी आमची पहिली कंपनी आहे. 2016 मध्ये 4G लाँच झाला तेव्हा जागतिक कंपन्यांशी करार केला होता. पण 5G चा विस्तार केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर भारत अंतर्गत मोहिमेत केला जाणार आहे.
मुकेश अंबानी यांनी बोर्डात महत्वपूर्ण बदल केले जात असल्याची घोषणा केली. संचालक मंडळाने ईशा अंबानी, आकाश अंबानी आणि अनंत अंबानी यांना बोर्डात बिगर कार्यकारी संचालक (Non Executive Director) म्हणून मंजुरी दिली आहे. भागधारकांच्या मंजुरीनंतर ही नियुक्ती अधिकृतपणे होईल. दरम्यान, यासह नीता अंबानी संचालक मंडळातून बाहेर पडल्या आहेत.
जिओच्या एअर फायबरची प्रतीक्षा आता संपली आहे. गणेश चतुर्थी म्हणजेच 19 सप्टेंबर रोजी जिओ एअर फायबर लाँच होणार आहे. Jio Air Fiber, 5G नेटवर्क आणि अत्याधुनिक वायरलेस तंत्रज्ञान वापरून घरं आणि कार्यालयांना वायरलेस ब्रॉडबँड सेवा प्रदान केली जाईल. जिओ एअर फायबरच्या लँडिंगमुळे दूरसंचार क्षेत्रात मोठी क्रांती होण्याची शक्यता आहे.
मुकेश अंबानी यांनी यावेळी समूह 2026 पर्यंत बॅटरी गिगाफॅक्टरी स्थापन करेल अशी घोषणा केली. गुजरातमधील जामनगरमध्ये ही सुविधा उभारण्यात येणार आहे.