पुण्यात मांजरांचं रेस्क्यू ऑपरेशन, ५६ मांजरांची सुटका

ऍनिमल वेलफेअर कार्यकर्त्यांनी पुण्यात एक अनोखं रेस्क्यू ऑपरेशन केलं.

Updated: Sep 13, 2017, 10:23 PM IST
पुण्यात मांजरांचं रेस्क्यू ऑपरेशन, ५६ मांजरांची सुटका  title=

अरुण मेहेत्रे, झी मीडिया, पुणे : ऍनिमल वेलफेअर कार्यकर्त्यांनी पुण्यात एक अनोखं रेस्क्यू ऑपरेशन केलं. कोंढवा परिसरातील एका घरात कोंडून ठेवलेल्या तब्बल ५६ मांजरांची पोलिसांच्या मदतीनं सुटका करण्यात आली. ऐकूऩ आश्चर्य वाटलं असेल, पण तब्बल ३ तास हे रेस्क्यू ऑपरेशन चाललं.

कोंढवा परिसरातील ब्रह्मा हॉरिझन सोसायटीतील एका फ्लॅटमध्ये मांजरांना ठेवण्यात आलं होतं. दीपिका कपूर आणि संगीता कपूर या भगिनींचा हा फ्लॅट आहे. त्यांचं मांजरांवर जीवापाड प्रेम आहे. म्हणून त्यांनी याठिकाणी मोठ्या संख्येनं मांजरं आणून ठेवली होती.

मांजरांना खायला प्यायला देण्याशिवाय त्या काहीच करत नव्हत्या. मांजराची सुश्रुषा तसंच स्वच्छता राखली जात नव्हती. इमारतीतील रहिवाश्यांना त्याचा प्रचंड त्रास होत होता. त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे हे मांजर प्रकरण पोलिसांपर्यंत गेलं आणि फ्लॅटमध्ये कोंडून ठेवलेल्या मांजरांची अखेर सुटका करण्यात आली.

कपूर भगिनींच्या बंद फ्लॅटमध्ये एकूण ५६ मांजरं आढळून आली. त्यांना बाहेर काढत असताना अनेक मांजरं पळून गेली. घरातील मांजरांना अशा प्रकारे उचलून नेणं बेकायदा असल्याचा दावा कपूर यांच्यावतीनं करण्यात आलाय.

सुटका करण्यात आलेल्या मांजरांची एनिमल वेल्फेअरच्या भूगावमधील प्राणी केंद्रात रवानगी करण्यात आलीय. त्यामुळे इतका काळ कोंडून राहिलेल्या मांजरांबरोबरच सोसायटीतील रहिवाश्यांनीही सुटकेचा निश्वास सोडलाय.