आमदार प्रणिती शिंदेंना कंटाळून राजीनामा दिल्याचा आरोप

काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांना कंटाळून राजीनामा दिल्याचा आरोप माजी शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी केला आहे. 

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Jan 25, 2018, 12:55 PM IST
आमदार प्रणिती शिंदेंना कंटाळून राजीनामा दिल्याचा आरोप title=

सोलापूर : काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांना कंटाळून राजीनामा दिल्याचा आरोप माजी शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी केला आहे. 

एका वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार, वारंवार टार्गेट करणं याला कंटाळून तसेच अनेक कारणांचा मानसिक त्रास होत असल्याने काँग्रेसचा राजीनामा द्यावा लागल्याचा आरोप माजी शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी आमदार प्रणिती शिंदे यांच्यावर नाव न घेता केला आहे. आमदार शिंदे यांचा संदर्भ देऊन विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना मात्र ''होय, मला त्यांनी वारंवार टार्गेट केले आहे, छळले आहे'', असं त्यांनी म्हटलं आहे.

खरटमल यांनी म्हटलं की, 'आमदार शिंदे लहान आहेत. त्यामुळे त्यांना माझ्याबाबत कुणी चुकीची माहिती दिली की त्या लगेच भडकतात. यापूर्वीही त्यांनी मला अनेक वेळा 'टार्गेट' केले आहे. छळले आहे. मात्र, मी ते फार मनावर घेतले नाही. मात्र हे प्रकार वारंवार होत असल्यानेच काँग्रेसचा राजीनामा देण्याचा निर्णय मी घेतला आहे.''

''गेल्या काही वर्षांत मला खूप मानसिक त्रास झाला आहे. त्यामुळे मी राजकीय कुटुंबातून बाहेर पडलो आहे. काँग्रेसमध्ये प्रोटोकॉल सांभाळला जात नाही. सन्मान दिला जात नाही. आम्ही सन्मानाचे भुकेले आहोत. शिंदे साहेबांना सर्वांना सांभाळायची ईच्छा असते. मात्र याबाबत ते मला सांभाळू शकत नाहीत याची खात्री झाल्याने राजीनामा दिला. काँग्रेसमध्ये शिल्लकच काही राहिले नाही,'' असेही खरटमल यांनी म्हटलं आहे.

खरटमल हे आमच्या घरचे सदस्य आहेत. आम्ही त्यांना कधीही अंतर दिले नाही. माझ्या त्रासामुळे राजीनामा द्यावा लागत असल्याचे ते कोणाच्या सांगण्यावरून बोलत आहेत हे माहित नाही. वैयक्तिक कारणामुळे राजीनामा दिला असावा. दर सहा-सात महिन्यांनी ते काहीतरी करीत असतात, त्यासाठी मी विशेष टिपण्णी देऊ इच्छित नाही. त्यांच्या मनात काय भ्रम आहेत ते मला माहीत नाही अशी आमदार प्रणिती शिंदे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.