ठाणे - आपण समाजाला काहीतरी देऊ लागतो अशी भावना असली तर आपल्याकडून काहीनाकाही चांगलं काम घडतंच. दुबईत स्थायिक असलेल्या अवघ्या 17 वर्षीय रीवा तुळपुळे हिने असाचा एक स्तुत्य उपक्रम केलाय. मराठी मुलगी रीवा तुळपुळे आणि तिचे सहकारी मधुर आणि विहान डावखरे यांनी ठाणे जिल्ह्यातील वाशिंद येथील आदीवासी पाड्यातील सरस्वती विद्यालयाला नुकतीच भेट दिली. या भेटीचा उद्देश त्या शाळेतील मुलींना मासिक पाळीच्या काळात घ्यावयाच्या स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करणे.
या भेटीत त्यांनी शाळेतील 1000 मुलींना सहा महिने पुरतील एवढ्या सॅनिटरी नॅपकिन्सचं वाटप देखील केलंय. सॅनिटरी नॅपकिन्स देण्यासोबत रीवा यांनी मुलींच्या मनातील अनेक शंका आणि गैरसमज दूर करून मासिक पाळी संदर्भात समुपदेशन देखील केलं.
अभिनेता अक्षय कुमार याच्या 'पॅडमॅन' चित्रपटामुळे प्रेरीत होऊन गेल्या चार वर्षांपासून 'वी केअर दुबई या प्लॅटफॉर्मवरून ही मोहीम सुरू झाली. गेल्या दोन वर्षात कोवीड काळात तिला भारतात येणं शक्य झाले नाही. मात्र त्या काळातही रीवाने सोशल मिडियावरून त्यांच्याशी संपर्क ठेवला होता. आता सर्वकाही नियंत्रणात आल्यामुळे, शाळा नेहमीप्रमाणे सुरू झाल्याने तिने तिची मोहीम पुन्हा जोमानं सुरू केली. रीवाची या मोहिमेतील भारतात येण्याची ही दुसरी खेप.
या मोहिमेच्या जोडीने शहापूर जवळील दुर्गम भागातील एका लहानशा प्राथमिक शाळेला रीवा आणि तिच्या सहकाऱ्यांनी भेट दिली. नागरिकांकडून निधी गोळा करून स्मार्ट डिजिटल सहायकासह शाळा सक्षम करणे, हा त्यांच्या कामाचा एक भाग होता. दुर्गम आदिवासी भागात गुणवत्तापूर्ण शिक्षक शोधणे हेही त्यांच्यासमोरचं एक आव्हान. "अत्याधुनिक शिक्षण यंत्रणा आणि सामग्री शाळांना मिळवून दिली तर शिक्षणाचा दर्जा वाढेल", असे विचार येवेळी रीवाने मांडले.
समन्वय प्रतिष्ठान, ठाणे या स्वयंसेवी संस्थेने या खास भेटीचे आयोजन केलं होतं. तर नाईन या नावाखाली सॅनिटरी पॅड्स बनवणाऱ्या कंपनीने मोहिमेला सहाय्य केलंय