'रोहित आणि युगेंद्र पवारांना तातडीने सुरक्षा द्या'; सुप्रिया सुळेंचे पोलीस अधीक्षकांना पत्र

Supriya Sule : रोहित पवार आणि युगेंद्र पवार यांच्या जीविताला धोका असून त्यांना पुरेशई सुरक्षा द्यावी, अशी मागणी करणारे पत्र सुप्रिया सुळेंचं पोलीस अधीक्षकांना लिहीलं आहे.

आकाश नेटके | Updated: Mar 22, 2024, 03:43 PM IST
'रोहित आणि युगेंद्र पवारांना तातडीने सुरक्षा द्या'; सुप्रिया सुळेंचे पोलीस अधीक्षकांना पत्र title=

Supriya Sule : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या आमदार रोहित पवार आणि युगेंद्र पवार यांना सुरक्षा व्यवस्था पुरवण्याची मागणी करण्यात आली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे जिल्हा पोलीस अधीक्षकांना पत्र लिहून पुरेशी सुरक्षा व्यवस्था पुरवण्याची मागणी केली आहे. आमदार रोहित पवार आणि युगेंद्र पवार यांना दडपशाहीचा सामना करावा लागत आहे, असे म्हणत सुप्रिया सुळेंनी पोलिसांना पत्र लिहीलं आहे. दरवेळेस युगेंद्र यालाच कसा काय घेराव घातला जातो असा सवालही सुप्रिया सुळेंनी केला आहे.

बारामती लोकसभा निवडणुकीवरुन राज्यातलं वातावरण तापलं आहे. बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत होणार आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे यांच्यासाठी शरद पवार गट आणि त्यांचे कुटुंबिय बारामतीमध्ये प्रचार करत आहेत. दोन दिवसांपूर्वी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी युगेंद्र पवार यांना घेराव घातला होता. त्याआधी शरद पवार यांनी मावळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना दमदाटी केली जात असल्याचे म्हटलं होतं. त्यामुळे आमदार रोहित पवार आणि युगेंद्र पवार सुरक्षा मिळावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी पोलिसांकडे केली आहे. 

काय म्हटलंय सुप्रिया सुळेंनी?

"लोकसभा निवडणूक प्रचारार्थ आमदार रोहित पवार व युगेंद्र पवार हे दौऱ्यामध्ये ठिकठिकाणी जात आहेत. ते दोघंही घटनात्मक, शांतपणे आणि लोकशाही मार्गानं लोकांशी संवाद साधत आहेत. परंतु, काही ठिकाणी त्यांना दडपशाहीचा सामना करावा लागत आहे. काही लोक घेराव घालून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. विविध वृत्तवाहिन्या व समाज माध्यमातून ही घटना सर्वांसमोर आलीय. संबंधितांची ही कृती पूर्णपणे असंवैधानिक आहे. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेद्वारा बहाल केलेल्या सर्वसामान्य नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटणारी आहे. स्व. यशवंतराव चव्हाण यांनी घडविलेल्या संवेदनशील महाराष्ट्रात असं घडणं शोभादायक नाही. या घटनांमुळे त्यांच्या सुरक्षिततेचे प्रश्न निर्माण झाला आहेत. त्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. ही अतिशय चिंतेची व गंभीर बाब आहे," असे सुप्रिया सुळे यांनी पत्रात म्हटलं आहे. 

दरम्यान, या पत्राबाबत माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळेंनी आमच्या मुलांसोबत हे होत असल्याचे दुर्दैवी असल्याचे म्हटलं आहे. "रोहित आणि युगेंद्र दोघे ही पक्षाचा प्रचार करत आहेत. दरवेळेस युगेंद्र यालाच कसा काय घेराव घालतात? जाब विचारायचा तर मला विचारा, मला घेराव घाला. आमच्या मुलांसोबत हे होतं आहे हे दुर्दैवी आहे. बारामतीचे नाव आम्ही देशात सांगतो," असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.