'18 ते 19 आमदार शरद पवारांच्या संपर्कात', रोहित पवारांचा दावा, म्हणाले 'कोणाला घ्यायचं हा निर्णय...'

 अजित पवारांच्या गटातील 18 ते 19 आमदार हे शरद पवारांच्या संपर्कात आहेत, असा दावा शरद पवार गटातील आमदार रोहित पवार यांनी केला आहे.

Updated: Jun 5, 2024, 06:53 PM IST
'18 ते 19 आमदार शरद पवारांच्या संपर्कात', रोहित पवारांचा दावा, म्हणाले 'कोणाला घ्यायचं हा निर्णय...' title=

Ajit Pawar Loksabha election Result : लोकसभा निवडणुकीचा निकाल अखेर जाहीर झाला. यात एनडीएला 292 जागा, इंडिया आघाडीने 234 जागांवर विजय मिळवला. तर 17 जागांवर इतर पक्षांच्या उमेदवारांचा विजय झाला. महाराष्ट्रात महाविकासआघाडीला 31 तर महायुतीला 17 जागांवर विजय मिळवला. आता यावर विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. अजित पवारांच्या गटातील 18 ते 19 आमदार हे शरद पवारांच्या संपर्कात आहेत, असा दावा शरद पवार गटातील आमदार रोहित पवार यांनी केला आहे.

"अजित पवारांचे 19 आमदार शरद पवारांच्या संपर्कात असल्याची माहिती आम्हाला मिळाली. त्याच बरोबर त्यांच्या गटातील 12 आमदार हे भाजपच्या संपर्कात असल्याचे बोललं जात आहे. ते काय करतील हे पुढच्या काही दिवसात आपल्याला समजेल. पण या 19 आमदारांपैकी कोणाला आमच्या पक्षात घ्यायचं आणि कोणाला घ्यायचं नाही हा निर्णय आमचे पक्षप्रमुख घेतील", असे अजित पवार म्हणाले. 

स्वतःच्या फायद्यासाठी पक्ष सोडून गेले त्यांना...

"पक्षाच्या अडचणीच्या काळात जे लोक आपल्याबरोबर निष्ठेने राहिले, त्यांनाच पहिलं प्राधान्य द्यायला हवं. जे लोक स्वतःच्या फायद्यासाठी पक्ष सोडून गेले त्या लोकांना, तसेच ज्यांना भाजपाने मारून-मुटकून, अडचणीत आणून तिकडे नेलं असेल त्यांना दुसरं प्राधान्य द्यावं, असे आम्हा सर्वच कार्यकर्त्यांना वाटतं", असेही अजित पवारांनी म्हटले. 

लोकांना फोडाफोडीचे राजकारण आवडत नाही

"महाराष्ट्रात लोकांच्या माध्यमातून आपल्या विचाराला यश मिळालेलं आहे. लोकांचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत. यशवंतराव चव्हाण यांचे विचार फक्त फोटो लावून मिळत नसतात. खऱ्या अर्थाने ते विचार जपावे लागतात. ते पवार साहेबांनी जपलेले आहेत. तत्व हे चव्हाण साहेबांसाठी महत्त्वाचे होते. पवार साहेब ते जपत आहेत. भाजपने कुटुंब फोडले, पक्ष फोडला. त्यांना वाटलं दिल्ली स्टाईल महाराष्ट्रात चालेल, पण त्यांना महाराष्ट्र कळलाच नाही. महाराष्ट्रातील लोकांना फोडाफोडीचे राजकारण आवडत नाही. बच्चा म्हणून जे आम्हाला हिणवलं होतं ते लोकांनी आम्हाला काल पाठिंबा देऊन दाखवून दिलं. आम्ही स्वतःला कार्यकर्ता समजतो. युवा पिढीला तुम्ही सहज घेऊ नका. बच्चा बडा हो गया है", असं रोहित पवारांनी म्हटलं आहे.

"विचारांची हार झाली हे जास्त महत्त्वाचं आहे. भाजपने पुरोगामी विचार पायाखाली तुडवण्याचा जो विचार केला होता, तो जनतेने हाणून पाडला आहे. व्यक्ती हरला का जिंकला यापेक्षा विचार जिंकला हे आमच्यासाठी महत्त्वाचं आहे", असे रोहित पवार म्हणाले. 

"नवीन चेहरे पाहायला मिळतील"

"युगेंद्र पवार हे पुढचे आमदार असतील का, असा प्रश्न रोहित पवारांना विचारण्यात आला होता. त्यावर रोहित पवारांनी तिकीट कोणाला कसे द्यायचे हे तिथे साहेब ठरवतात साहेबांना याबाबत विचारावे लागेल. येणाऱ्या काळात 200 च्या पुढे महाविकासआघाडीचे आमदार हे निवडून आलेले आपल्याला पाहायला मिळतील. त्याच्यात अनेक मेजॉरिटीने नवीन चेहरे पाहायला मिळतील", असा विश्वासही रोहित पवारांनी व्यक्त केला. 

"बारामतीकरांनी आतापर्यंत ज्या विचाराला पाठिंबा दिला, शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांना आजपर्यंत बारामतीकरांनी पाठिंबा दिला आणि भाजपच्या विचाराला नाकारलं आहे. प्रत्येक ठिकाणी महापुरुषांच्या विचारांचा अवमान भाजपकडून होत गेल्यामुळे त्यांना महाराष्ट्राने दाखवून दिला आहे", असेही रोहित पवारांनी म्हटले.

 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x