मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पूत्र अमित ठाकरे यांची राजकारणात एन्ट्री झाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाअधिवेशनात अमित ठाकरे यांची नेतेपदी निवड करण्यात आली. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी अमित ठाकरे यांची नेतेपदी निवड करत असल्याची घोषणा केली. यावेळी अमित ठाकरे यांनी वडील आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आभार मानले. राज ठाकरे यांनी काल संध्याकाळी आपल्याला ठराव मांडण्यासंदर्भात सांगितलं. त्यावेळी पायाखालची जमीन सरकली होती असं यावेळी अमित ठाकरे यांनी सांगितलं. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. याआधी जे प्रेम, प्रतिसाद दिला तो यापुढेही द्याल अशी अपेक्षा त्यांनी मनसे कार्यकर्त्यांसमोर व्यक्त केली.
‘महाराष्ट्र नवनिर्माण सेने’च्या नेतेपदी निवड झाल्याबद्दल अमित राज ठाकरे यांचं हार्दिक अभिनंदन आणि त्यांना भावी कार्यासाठी शुभेच्छा. आमच्यात राजकीय मतभेद असले तरी जनतेच्या व राज्याच्या हितासाठी गरज असेल तिथे मित्र म्हणून व्यक्तीगत पातळीवर एकमेकांना कायमंच सहकार्य राहील. pic.twitter.com/foqPWQ93uM
— Rohit Pawar (@RRPSpeaks) January 23, 2020
महाराष्ट्राच्या राजकाणात अनेक राजकीय घराण्यातील तरुण पिढी उतरत आहे. पवार कुटुंबातून पार्थ पवार, रोहित पवार, देशमुख कुटुंबातून धीरज देशमुख, अमित देशमुख, ठाकरे कुटुंबातील तिसरी पिढी आदित्य ठाकरे आणि आता अमित ठाकरे, प्रणिती शिंदे, आदिती तटकरे असे अनेक युवा नेते आता राजकारणात सक्रिय झाले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून अमित ठाकरे यांची राजकारणात एन्ट्री कधी होणार याबाबत चर्चा सुरु होत्या. आज मनसेच्या राज्यव्यापी अधिवेशनात त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली.