आजोबांसोबत रोहित दुष्काळ दौऱ्यावर, पण पार्थ कुठंय?

आगामी विधानसभा निवडणुकीत शरद पवारांचे आणखी एक नातू रिंगणात दिसण्याची शक्यता आहे

Updated: May 15, 2019, 08:54 AM IST
आजोबांसोबत रोहित दुष्काळ दौऱ्यावर, पण पार्थ कुठंय?

बीड : राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार हे सध्या महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये दुष्काळी दौरा करत आहेत. मात्र या दौऱ्यांमध्ये पवारांसह सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत ते त्यांचे नातू रोहित पवार. गेल्या काही महिन्यांपासून रोहित पवार हे पवारांसोबत अनेक दौऱ्यांमध्ये दिसून आले. कोकण दौरा असो की वाघा बॉर्डर असो... साताऱ्याचा दुष्काळी भाग असो की बीडचा दौरा असो... रोहित, शरद पवारांसोबत जातीनं हजर असतात. त्यामुळे दुष्काळी दौऱ्याच्या निमित्तानं रोहित आजोबांकडून जनसंपर्क आणि राजकारणाचे धडे गिरवताना दिसतोय. मात्र या सर्व चित्रांमधून अजित पावर यांचे चिरंजीव पार्थ पवार हे गायब आहेत.

विधानसभा निवडणुकीत रोहित एक्शनमध्ये?

आगामी विधानसभा निवडणुकीत शरद पवारांचे आणखी एक नातू रिंगणात दिसण्याची शक्यता आहे. तसा आग्रहच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलाय. अहमदनगरमधल्या कर्जत जामखेड मतदारसंघातून त्यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी कार्यकर्ते करतायत. हे तेच रोहित पवार आहेत ज्यांनी शरद पवारांच्या निवडणुकीतून माघारीवर सोशल मीडियावर भावूक पोस्ट लिहिली होती. तर दुष्काळी परिस्थितीच्या पाहणीसाठी शरद पवार आणि नातू रोहित पवार नगरमध्ये गेले होते. यावेळी कार्यकर्त्यांनी ही मागणी केलीय. कर्जत परिसरातल्या काही गावांमध्ये रोहित पवार यांच्या पुढाकारातून पाण्याचे टँकर सुरू आहेत.

पवारांनाही 'सेल्फी'चा अनुभव

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार दुष्काळी भागाच्या दौऱ्यावर असून शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत. बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना पवारांना वेगळाच अनुभव आला. बीडपासून पाटोदाकडे जात असताना एके ठिकाणी ग्रामस्थांनी शरद पवार यांची गाडी थांबवली. शरद पवारही थांबले आणि लोकांना काही अडचण आहे का? अशी विचारणा केली. त्यावर 'अडचणी जाऊ द्या साहेब फक्त एक सेल्फी काढू द्या' असं ग्रामस्थ म्हणाले. मात्र ग्रामस्थांच्या तोंडून हे ऐकून शरद पवार अवाक झाले. मात्र शरद पवार गाडीतून उतरले आणि गावकऱ्यांसोबत फोटो काढला.