एकदा तरी या 'रोझ वाईन'ची चव चाखून पाहाच...

 एका गुलाबी स्वप्नाचा पाठलाग मायलेकींनी तब्बल नऊ वर्षं केला.... गुलकंद उत्पादक ते वायनरी हा प्रवास आहे पुण्यातल्या जयश्री आणि कश्मिरा यादव या मायलेकींचा... जितका खडतर तितकाच स्फुर्तिदायकही!

Updated: Jun 13, 2017, 02:51 PM IST
एकदा तरी या 'रोझ वाईन'ची चव चाखून पाहाच...  title=

अश्विनी पवार, झी मीडिया पुणे : एका गुलाबी स्वप्नाचा पाठलाग मायलेकींनी तब्बल नऊ वर्षं केला.... गुलकंद उत्पादक ते वायनरी हा प्रवास आहे पुण्यातल्या जयश्री आणि कश्मिरा यादव या मायलेकींचा... जितका खडतर तितकाच स्फुर्तिदायकही!

काहीतरी उद्योग करावा आणि संसाराला हातभार लावावा, यासाठी जयश्री यादव यांनी हर्बल कल्टिवेंटिगचा अभ्यास केला... शेतीतलं काहीही कळत नसतानाही शेत विकत घेतलं, त्यामध्ये गुलाबांची शेती करण्याचं धाडस जयश्री यांनी दाखवलं. त्यातूनच देशी गुलाबांपासून गुलकंद बनवण्याची संकल्पना त्यांना सुचली. मात्र, व्यवसाय सुरु करणं सोपं नव्हतं... उद्योगाचे परवाने, उद्योग कर्ज, विपणन, लेबलिंग या सगळ्या अडी अडचणी पार करत २००० साली 'जयश्री प्रोडक्टस' ही कंपनी सुरु झाली... देशी गुलाबांपासून गुलकंद, गुलाबपाणी तयार होऊ लागलं.

गुलाबापासून काहीतरी नवं करण्याची इच्छा होती... आणि नवं ध्येय ठरलं... गुलाबापासून वाईन तयार करण्याचं... सुरुवातीला गुलाबाच्या पाकळ्यांचं सरबत तयार केलं. वाईन बनवायचीच तर देशी गुलांबाच्या पाकळ्यांपासूनच, असा निश्चय जयश्री यांनी केला.

देशात आत्तापर्यंत फक्त द्राक्षं आणि फळांपासूनच वाईन तयार केली जात होती. त्यामुळे त्यांच्या वाईन या प्रकल्पाला काही कायदेशीर अडचणीही आल्या.  कायद्याच्या चौकटी पार करत, लालफितीचा सामना करत अखेर २००९ साली जयश्री प्रॉडक्टसला रोझ वाईनचं पेटंट मिळालं. 

देशी गुलाबांपासून वाईन तयार करण्यासाठी आता १० एकर जमिनीवर गुलाबाची बाग फुललीय. सध्या गुलकंद बनविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या या गुलाबांचं उत्पादन कोणत्याही रासायनिक खतांचा वापर न करता सेंद्रिय पध्दतीने घेतलं जातं.  

जयश्री यादव यांच्या या प्रयत्नांमध्ये त्यांना साथ मिळाली ती त्यांची मुलगी कश्मिराची... वाईन निर्मितीचा विचार पुढे आल्यावर  कश्मिराने परदेशात जाऊन ग्रेप वाईन निर्मितीचं प्रशिक्षण घेतलं... तर 'रोझ ऑईल' निर्मितीमध्ये इंटर्नशिपही केली. वाईन टेस्टिंगमध्ये निष्णात असलेल्या कश्मिराला गुलाबांच्या सुवासावरुनच त्यातले गुण ओळखता येतात... उत्तम रंग, सुगंध आणि औषधी असणाऱ्या देशी गुलाबांची वाईनही तितकीच उत्तम प्रतीची असल्याचा दावा कश्मिरा करते.

एका बाजूला आज बाजारामध्ये गुलाबांच्या विदेशी जातींची चलती असताना या मायलेकींच्या प्रयत्नामुऴे देशी गुलाबाला थेट वाईनची बाजारपेठ खुली झालीय. त्यामुळे वाईनचा हा भारतीय ब्रॅंड नक्कीच जगभरात प्रसिध्द होईल, अशी या दोघींनाही आशा आहे.