बहुमत असताना अजित पवारांना सोबत का घेतले? RSS चा भाजपाला सवाल; काढली खरडपट्टी

RSS Slams BJP Maharashtra Politics: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जन्म ज्या महाराष्ट्राच्या भूमित झाला तिथेच भाजपाची निराशाजनक कामगिरी झाल्याच्या पार्श्वभूमीवर यामागील कारणांवरुन संघाने भाजपा नेत्यांवर निशाणा साधला आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jun 12, 2024, 10:39 AM IST
बहुमत असताना अजित पवारांना सोबत का घेतले? RSS चा भाजपाला सवाल; काढली खरडपट्टी title=
भाजपाच्या राजकारणावर साधला निशाणा

RSS Slams BJP Maharashtra Politics: लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीची मातृक संस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जन्मस्थानी म्हणजेच महाराष्ट्रात आलेल्या अपयशावर संघाने भाष्य केलं आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रामध्ये भाजपाच्या निराशाजनक कामगिरीचं विश्लेषण करताना थेट अजित पवारांचा उल्लेख करत भाजपाच्या राज्यातील नेत्यांच्या धोरणांवर संघाने निशाणा साधला आहे. महाराष्ट्रात अजित पवारांशी केलेली हातमिळवणी व काँग्रेसच्या नेत्यांना पक्षात घेतल्यामुळे भाजपच्या ‘ब्रँड’ला धक्का बसल्याचा टोला संघाचं मुखपत्र असलेल्या 'ऑर्गनायझर'मधून लगावण्यात आला आहे. 

अजित पवारांना सोबत का घेतले?

'ऑर्गनायझर’ मासिकाच्या अंकात संघाचे आजीव स्वयंसेवक असलेल्या रतन शारदा यांनी लिहिलेल्या लेखामध्ये लोकसभेच्या निकालांचं विश्लेषण करण्यात आलं आहे. यामध्ये महाराष्ट्रातील कामागिरीवर विशेष नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. महाराष्ट्रात भाजप व शिंदेंची शिवसेना यांच्याकडे पुरेसे बहुमत असताना अजित पवारांना सोबत का घेतले, हा प्रश्नच आहे, असं या लेखात म्हटलं आहे. साधारण अडीच वर्षापूर्वी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमधून बाहेर पडलेल्या आमदारांच्या मदतीने भाजपाने राज्यात सरकार स्थापन केलं होतं. त्यानंतर 2023 मध्ये मे महिन्यात अजित पवार यांच्यासहीत आमदारांचा मोठा गट मूळ राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडला आणि शिंदे सरकारबरोबर सत्तेत सहभागी झाला. मात्र अजित पवार गटाला का सत्तेत घेतलं हे नकळण्यासारखं असल्याचं संघाने म्हटलं आहे.

शरद पवारांच्या पक्षाला उतरती कळा लागली असती

"अनावश्यक राजकारण तसेच हेराफेरीचं उत्तम उदाहरण म्हणून महाराष्ट्राकडे पाहता येईल. महाराष्ट्रात जे घडलं ते टाळता आलं असतं. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचा गट भाजपमध्ये सामील झाला. खरं तर भाजपा आणि शिवसेना (शिंदे गटाला) सहज बहुमत मिळालं असतं. पुढील 2 ते 3 वर्षांमध्ये शरद पवारांच्या पक्षाला राष्ट्रवादी पक्षाला अंतर्गत कलहामुळे उतरती कळा लागली असती," असं 'ऑर्गनायझर'मध्ये म्हटलं आहे.

काँग्रेस नेत्यासाठी पायघड्या घातल्यानेही नाराजी

तसेच थेट कोणत्याही नेत्याचा उल्लेख न करता 'ऑर्गनायझर'च्या लेखात काँग्रेसच्या नेत्याला भाजपामध्ये घेण्याचाही फटका निवडणुकीत बसल्याचं म्हटलं आहे. "ज्या काँग्रेसी विचारसरणीविरोधात वर्षानुवर्षे लढलो त्यांच्या संघावर टीका करणाऱ्या काँग्रेस नेत्याला पायघड्या घालण्यात आल्याने भाजपा समर्थक दुखावले गेले. ‘भगव्या दहशतवादा’चे आरोप करणाऱ्या, 26/11 ला संघाचे कटकारस्थान म्हणणाऱ्या व संघाला दहशतवादी संघटना असे संबोधणाऱ्या काँग्रेस नेत्याला भाजपामध्ये प्रवेश देण्यात आला. यामुळे संघ स्वयंसेवकांची मने दुखावली गेली," असंही या लेखात म्हटलं आहे. काँग्रेसचा संदर्भ देत केलेल्या टीकेचा रोख हा राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांच्या दिशेने असल्याची चर्चा आहे.