नाशिक : नाशिकचे नवे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्यकर्तृत्वाचा एका बाजूला सर्व सामान्य जनतेत दबदबा निर्माण झाला असताना, तुकाराम मुंढे सध्या सुटीवर जात असल्याने चर्चेला आणि अफवांना ऊत आला आहे. आपल्या कठोर निर्णयामुळे सत्ताधारी भाजप कोमात आहे, तर दुसरीकडे विरोधक जोमात, यातच आता नाशिक महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंडे परवा पासून युरोपच्या सहलीला रवाना होणार आहेत. तुकाराम मुंढे हे २९ तारखेला ते आपला पदभार जिल्हाधिकाऱ्यांना सोपवणार आहेत. यावरून तुकाराम मुंढे यांचा युरोप दौरा हा निश्चित आहे. हे स्पष्ट होतं आहे.
तुकाराम मुंढे यांनी घेतलेला करवाढीचा निर्णय आणि महासभेचा स्थगितीचा निर्णय, हे दोन्ही आचारसंहितेच्या कचाट्यात सापडले असताना, त्यांच्या युरोप दौऱ्याने नाशिक शहरात खमंग चर्चेला उत आला आहे. तर दुसरीकडे तुकाराम मुंढे यांच्या निर्णयामुळे जनतेत निर्माण झालेला रोष कमी करण्यासाठी, त्यांना रजेवर पाठविल्याची, तर सरकारने पुन्हा त्यांची बदली केल्याच्या अफवा जोरात आहे.
मुळात कोणत्याही व्यक्तीचं युरोप दौऱ्याचं नियोजन एवढ्या कमी दिवसात होत नाही, तेव्हा तुकाराम मुंढे यांचा युरोप दौरा पूर्वनियोजित असावा. यानंतर तुकाराम मुंढे पुन्हा आपल्या कामाची चुणूक नाशिक शहरात दाखवतील असंही दुसऱ्या बाजूला म्हटलं जातं आहे.