पुणे : माजी मंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी केलेल्या एका वक्तव्याने सध्या राज्याच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे. राज्यकर्त्यांची तुलना सदाभाऊ खोत यांनी रेड्याशी केली आहे. राज्यकर्ते म्हणजे रेड्यांची औलाद आहेत. पाठीवर हात ठेवल्याशिवाय रेडे वेद बोलत नाहीत त्याचप्रमाणे राज्यकर्तेही बोलत नाही असा टोला माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी राज्यकर्त्यांना लगावलाय. जिकडे जास्त डोकी तिकडेच राज्यकर्ते बोलतात, आणि तिथं नको ते बोलून जातात असा म्हणत सदाभाऊ खोतांनी राज्यकर्त्यांना चिमटाही काढलाय. पुण्यात एका कार्यक्रमात बोलतांना त्यांनी हे विधान केलंय. विशेष म्हणजे त्यांच्यासोबत आमदार बच्चू कडू, आमदार गोपीचंद पडळकर हे देखील कार्यक्रमाला उपस्थित होते.
विद्यार्थी अधिवेशनात सदाभाऊंची जीभ घसरली
पुण्यात वास्तव कट्टा आणि अर्हम फाऊंडेशनच्यावतीने स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात सदाभाऊ खोत, आमदार बच्चू कडू, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार निरंजन डावखरे आणि आमदार अभिमन्यू पवार उपस्थित होते. दरवर्षी राज्यव्यापी विद्यार्थी अधिवेशन (Statewide Student Convention) आयोजित केलं पाहिजे, कारण जिकडे जास्ती डोकी, तिकडे राज्यकर्ते बोलतात असं यावेळी सदाभाऊ खोत यांनी म्हटलं.
आपण सर्वांनी मिळून भ्रष्टाचार कसा संपेल याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचं सांगत सदाभाऊ खोत यांनी सरकार कोणाचंही असलं तरी भ्रष्टाचार होत असल्याचं सांगितलं. अभ्यास करणारा विद्यार्थी मागे रहातो, आणि पैसे देणारा विद्यार्थी पुढे जातो, बेरोजगारी हा विषय सरकारच्या अजेंड्यावर असला पाहिजे असंही सदाभाऊ खोत यांनी सांगितलं.
सदाभाऊ खोत यांचं स्पष्टीकरण
दरम्यान, सदाभाऊ खोत यांनी केलेल्या वक्तव्यावर चर्चा सुरु झाल्यानंतर आपण केलेलं विधान फार मोठं नाही, मी बोलताना मला काही शंका आली नाही, ज्यांच्या मनात शंका येऊ शकते त्यांच्याच मनाला हा शब्द लागू शकतो, असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे. तुम्ही तुमचे प्रश्न राजकारण्यांच्या समोर बोललं पाहिजे असा आपला हेतू असल्याचंही सदाभाऊ खोत यांनी म्हटलंय. राज्यात, देशात शेतकरी, बेरोजगार लोक आत्महत्या कोणामुळे करत आहेत याचे आत्मचिंतन होण्याची गरज असल्याचंही सदाभाऊ खोत यांनी सांगितलं.