Aditya Thackeray : ठाकरे गटाचे (Tackeray Group) आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आज संभाजीनगर (Sambhaji Nagar) दौऱ्यावर होते. संभाजीनगरातल्या वैजापूरमध्ये आदित्य ठाकरेंची सभा संपल्यानंतर जोरदार राडा झाला. आदित्य ठाकरेंच्या वाहनांचा ताफा सभास्थळावरून निघत असताना काही तरुण त्याठिकाणी आले. त्यांनी वाहनं अडवण्याचा प्रयत्न केला. त्यावरून पोलीस आणि संतप्त तरुण यांच्यात चांगलीच झटापट झाली. पोलिसांनी या तरुणांना रोखलं आणि त्यानंतर आदित्य ठाकरे तिथून रवाना झाले.
स्टेजवर दगड भिरकावला
त्याआधी आदित्य ठाकरे यांची वैजापूरमध्ये (Vaijapur) सभा सुरु असताना अज्ञातानं स्टेजवर दगड भिरकवल्याचा प्रकार घडला. त्याचवेळी रमाई मिरवणूक समोरून जात असल्यामुळे गोंधळ उडाला. चंद्रकांत खैरेंचं भाषण सुरु असताना स्टेजवर दगड भिरकवण्यात आला.. घडलेल्या प्रकारानंतर वाद टाळण्यासाठी आदित्य ठाकरेंनी स्टेजवरून खाली उतरून आवाहन केलं. डीजे वाजवा मात्र वाद नको असं मिरवणुकीतल्या तरुणांना आदित्य ठाकरेंनी सांगितलं. शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र असल्याची आठवणही आदित्य ठाकरेंनी यावेळी करुन दिली.
भीमशक्ती-शिवशक्ती एकच
आदित्य ठाकरे यांची महालगावमध्ये ज्या ठिकाणी शिवसंवाद यात्रेची सभा सुरु होती, त्याच्या काही अंतरावरच रमाबाई जयंती साजरी केली जात होती. यानिमित्ताने मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी पोलिसांनी भीमसैनिकांना डीजे थांबण्याची विनंती केली. यावेळी किरकोळ दगडफेक झाली. यावेळी आदित्य ठाकरे यांनी स्टेजवरुन खाली उतरत भाषण केलं तसंच भीमशक्ती-शिवशक्ती एकच आहे, तुम्हाला डीजे वाजवाचा आहे तर वाजवा असं सांगितलं.
चंद्रकांत खैरे यांचा गंभीर आरोप
ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी पोलिसांवर याचं खापर फोडलं आहे. व्हीआयपी संरक्षण कसं असलं पाहिजे यावर पोलिसांनी लक्ष दिलं नाही, असा आरोप चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. गद्दार आमदार रमेश बोरनारे यांनी काही जणांना दारू पाजून गोंधळ घालण्यासाठी पाठवलं होतं, असा गंभीर आरोपही चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.
याच गावात झाला होता राडा
दरम्यान याच काही दिवसांपूर्वी ठाकरे गट आणि शिंदे गटात राडा झाला होता. शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे एका कार्यक्रमानिमित्ताने या गावात आले होते, त्यावेळी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना जोरदार विरोध केला होता. पोलिसांनी मध्यस्थी करत परिस्थिती आटोक्यात आणली होती.