संभाजीनगरच्या पोलीस आयुक्तांच्या मुलाने स्वत:ला संपवलं! आरशावर लिहिलेलं, 'I Don't...'; वाढलं गूढ

Sambhaji Nagar Police News: या प्रकरणामधील गूढ वाढण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे आत्महत्येपूर्वी या मुलाने त्याच्या बेडरुममधील आरशावर काही ओळी लिहून ठेवल्या.

स्वप्निल घंगाळे | Updated: Oct 14, 2024, 08:09 AM IST
संभाजीनगरच्या पोलीस आयुक्तांच्या मुलाने स्वत:ला संपवलं! आरशावर लिहिलेलं, 'I Don't...'; वाढलं गूढ title=
रविवारी सकाळी समोर आला हा प्रकार (पोलिसांचा फोटो प्रातिनिधिक, सौजन्य - पीटीआय)

Sambhaji Nagar Police News: संभाजीनगरच्या पोलीस उपायुक्तांच्या मुलाने राहत्या घरात आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. हा सारा प्रकार रविवारी समोर आला जेव्हा हा मुलगा त्याच्या बेडरुममध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याच्या वडिलांना आढळून आला. मात्र त्याने ही आत्महत्या का केली यासंदर्भातील कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र त्याने बेडरुममधील ड्रेसिंग टेबलच्या आरशावर काही ओळी लिहून ठेवल्याचं आढळून आलं आहे. 

आई-वडिलांशी गप्पा मारल्या अन् त्यानंतर...

मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस उपायुक्त शीलवंद नांदेडकर यांच्या मुलाने स्वत:ला संपवलं. शीलवंत नांदेडकर यांचा एकुलता एक मुलगा असलेल्या साहिलने शनिवारी रात्री आई-वडिलांबरोबर निवांत गप्पा मारल्या. अभ्यास कसा सुरु आहे, सध्या आजू-बाजूला सुरु असलेल्या घडामोडींबद्दल साहिलने पालकांबरोबर गप्पा मारल्या. त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास तो आपल्या बेडरुममध्ये झोपण्यासाठी गेला. 

वडील सकाळी झोपेतून उठवायला गेले असता...

नेहमीप्रमाणे साहिलचे वडील सकाळी त्याला उठवायला गेले असता त्यांना साहिलने गळफास घेतल्याचं आढळून आलं. साहिलने आत्महत्या का केली याचं गूढ अद्याप उलगडलेलं नाही. रात्री आई-वडिलांबरोबर अनेक विषयांवर गप्पा मारणाऱ्या या 17 वर्षीय तरुणाने अचानक असं टोकाचं पाऊल का उचललं? त्याच्या मनात नेमकं काय सुरु होतं? स्वत:ला संपवण्याचा निर्णय घेण्याइतकी कोणती गंभीर गोष्ट त्याच्या आयुष्यात घडली होती जी त्याचे पालकांपासूनही लपवून ठेवली? यासारख्या गोष्टींचा उलगडा अजून झालेला नाही. पोलीस या प्रकरणाची सध्या चौकशी करत असून आत्महत्येची नोंद करत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. साहिलच्या आत्महत्येमुळे त्याच्या आई-वडिलांना मोठा मानसिक धक्का बसला आहे. 

आरशावरील त्या ओळी...

साहिलने आत्महत्या का केली याबद्दलचं कोणतही कारण समोर आलेलं नसतानाच त्याने स्वत:ला संपवण्यापूर्वी ड्रेसिंग टेबलवरील आरशावर तीन वाक्य लिहून ठेवली. "आय वॉन्ट टू रिस्टार्ट, आय डोन्ट क्विट! लव यू बोथ," असा मजकूर साहिलच्या बेडरुममधील आरशावर लिहिलेला आढळून आला. या ओळींमुळे साहिलच्या आत्महत्येच्या कारणाचं गूढ अजून वाढलं आहे. पोलीस या प्रकरणात आता साहिलच्या मित्रमैत्रीणींबरोबरच त्याच्या मोबाईलवरुन किंवा रुमधील इतर वस्तूंच्या माध्यमातून आत्महत्येच्या कारणासंदर्भात काही सापडतंय या संदर्भात तपास करत आहेत. 

आत्महत्येसंदर्भात समोपदेशन

मानसिक तणाव किंवा इतर कारणांमुळे आत्महत्येचे विचार डोक्यात येणाऱ्यांना मदत करणाऱ्या अनेक संस्था सध्या कार्यरत आहेत. अनेक संस्था सध्या समोपदेशनाच्या माध्यमातून यासंदर्भात काम करत असून इंटरनेटवरही अनेक संस्थाचे क्रमांक सहज उपलब्ध आहेत.