नाशिक : भाजपचे नेते वसंत गीते आणि सुनील बागुल यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. नाशिकच्या एक्स्प्रेस इन हॉटेलमध्ये हे दोघे शिवसेनेच्या गोटात सामील झाले. आज संध्याकाळी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हे दोन्ही नेते शिवसेनेत अधिकृत प्रवेश करणार आहेत. संजय राऊत यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला. यावेळी राऊत यांनी भाजपवर टीका केली.
'शिवसेनेत भाजपमधील आणखी नेते येतील. संभाजीनगर हे संभाजीनगरच आहे आणि राहणार. त्यामध्ये काही मतभेद नाही. काँग्रेस विरोध करत आहेत. पण ते मनातून संभाजी राजे यांचेच भक्त आहेत. ते औरंगजेबाचे भक्त असू शकत नाहीत. औरंगजेब हे काय सेक्युलर व्यक्तिमत्व नव्हतं.' असं ही राऊत यांनी म्हटलं आहे.
संजय राऊत यांनी म्हटलं की, 'नामकरण होणे आवश्यक आहे. काँग्रेसच्या भूमिका वेगळ्या आहेत मात्र मनातून ते ही संभाजी महाराजांसोबत आहेत. औरंगाबद विमानतळाचे नाव सुद्धा धर्मवीर छत्रपती शिवाजी महाराज करण्यात यावे. ईडीच्या नोटीसा, ईडी लावा, सीबीआय लावा, केजीबी लावा मात्र आमही एकत्रित लढू आणि विजयी होऊ. आम्ही सुडाचे राजकारण करू इच्छित नाही. गिरीश महाजन याची केस जुनी आहे असे त्यांचे म्हणणे आहे. केंद्र सरकारच्या यंत्रणा आमच्या केसेस काढते दोन द्यावे दोन घ्यावे असे व्हायला हवे.'
राज्यपाल नियुक्त आमदारांचा विषय प्रलंबित ठेवण्यात आला आहे. घटनात्मक पदावरील बसलेल्या राज्यपालांनी पळाले पाहिजेत. बारा आमदारांच्या शिफारशी कॅबिनेटने केल्या. आज दहा महिने होत आले मात्र अजून अभ्यास सुरू आहे. सरकार पाडले जात नाही तोवर सह्या करणार नाही याचा खुलासा राज्यपालांनी करायला हवा. घटनेचा खून तुम्ही करू नका. त्यांच्या अडचणी राज्यपालांनी स्पष्ट करायला हवे घटनेचा हा अपमान आहे. अशी टीका ही संजय राऊत यांनी केली आहे.