महाराजांचा पुतळा उभारला तेव्हाच सांगितलेलं... ; संभाजीराजे छत्रपतींनी समोर आणलं पंतप्रधानांना लिहिलेलं 'ते' पत्र

Shivaji Maharaj Statue : सिंधुदुर्गात महाराजांचा 'तो' पुतळा उभा राहिला तेव्हाच... संभाजीराजे छत्रपती यांनी स्पष्ट सांगितलं होतं. पण... 

सायली पाटील | Updated: Aug 27, 2024, 08:09 AM IST
महाराजांचा पुतळा उभारला तेव्हाच सांगितलेलं... ; संभाजीराजे छत्रपतींनी समोर आणलं पंतप्रधानांना लिहिलेलं 'ते' पत्र title=
Sambhajiraje chatrapati on Shivaji Maharaj statue collapse in sindhudurg kokan

Shivaji Maharaj Statue : छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या काळात उभारण्यात आलेले गडकिल्ले आजही इतिहासाची साक्ष देतात. अशा या छत्रपतींच्या सबंध कारकिर्दीमध्ये महाराष्ट्राच्या सागरी सीमा अधिक भक्कम आणि सुरक्षित करण्यासाठीचे प्रयत्न झाले आणि यातूनच महाराष्ट्राला मिळाले अभेद्य जलदुर्ग. महाराष्ट्राच्या याच सागरी किनाऱ्यावर, सिंधुदुर्गातील मालवण येथे असणाऱ्या राजकोट किल्ल्यावर महाराजांचा एक पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता. 4 डिसेंबर 2024 ला म्हणजेच भारतीय नौदल दिवसाच्या निमित्तानं या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं होतं. 

खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी, नौदल प्रमुख, केंद्रीय संरक्षण मंत्री आणि इतर अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत या पुतळ्याचा अनावरण सोहळा पार पडला होता. पण, पुतळ्याच्या अनावरणानंतर लगेचच संभाजीराजे छत्रपती यांनी पंतप्रधनांना एक पत्र लिहित या पुतळ्यातील काही उणिवा समोर आणल्या होत्या. सोमवारी 26 ऑगस्ट 2024 रोजी ज्यावेळी हा पुतळा कोसळला तेव्हा मात्र संभाजीराजे छत्रपती यांनी उद्विग्न प्रतिक्रिया देत पंतप्रधनांना लिहिलेलं ते पत्र जाहीर केलं. 

सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी हे पत्र सर्वांसमक्ष आणत या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, 'पंतप्रधानांनी उद्घाटन करण्यासाठी घाई गडबडीत उभारलेला पुतळा कोसळला ! मुळातच आकारहीन व शिल्पशास्त्रास अनुसरून नसलेला व घाईगडबडीत उभारलेला हा पुतळा बदलावा म्हणून तेव्हाच आम्ही पंतप्रधानांकडे पत्र लिहून मागणी केली होती. या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक वर्षभरात कोसळते यासारखी दुर्दैवी बाब कोणती नाही. अशा परिस्थितीत महाराजांच्या किल्ल्यांवर आपण कोणत्या अधिकाराने बोलणार !

हेसुद्धा वाचा : '3 वर्षांचं काम 6 महिन्यात केलं'; शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर मूर्तीकाराची मुलाखत व्हायरल

आता त्याठिकाणी पुन:श्च महाराजांचे उचित स्मारक उभारणे गरजेचेच आहे. पण निवडणुकीच्या आधी ते उभारण्याच्या इर्ष्येत परत काही गडबड करू नये. उशीर होऊदे पण शास्त्रोक्त पद्धतीने या स्मारकाची पुनर्बांधणी झाली पाहिजे.'

संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रातून नेमक्या कोणत्या गोष्टी अधोरेखित केल्या होत्या? 

संभाजीराजे छत्रपती यांनी महाराजांच्या पराक्रमाच्या स्मृती जपण्यासाठीच्या प्रयत्नांचं कौतुक करत सिंधुदुर्गातील राजकोट येथे उभारण्यात आलेला हा पुतळा उत्तम शिल्पकलेच्या मानदंडात बसत नसल्याचं स्पष्ट केलं होतं. या पुतळ्याची/ शिल्पाची घडण प्रभावी आणि रेखीव नसल्याचं म्हणत त्याचं काम अतिशय घाईगडबडीत केल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं. मूर्तीतील अनेक बारकाव्यांविषयीसुद्धा या पत्रातून संभाजीराजेंनी भाष्य केलं होतं. 

महाराजांच्या वंशजांकडूनच त्यांच्या पुतळ्याविषयीचे बारकावे आणि इतर उणीवा अधोरेखित केल्या जाऊनही त्याकडे झालेलं दुर्लक्ष आणि त्यानंतर घडलेली घटना पाहता आता संभाजीराजेंच्या मागणीचा केंद्रात विचार केला जाणार हा हे पाहणं महत्त्वाचं असेल.