Bullock Cart | आता बैलगाडीला लागणार 'ब्रेक'

बैलगाडी म्हंटली की डोळ्यांसमोर येतात जुकाडाला जुंपलेले दोन बैल आणि दोन चाकांची गाडी.  

Updated: Apr 4, 2022, 10:59 PM IST
Bullock Cart | आता बैलगाडीला लागणार 'ब्रेक' title=

चैत्राली राजापूरकर, झी 24 तास, मावळ : बैलगाडी म्हंटली की डोळ्यांसमोर येतात जुकाडाला जुंपलेले दोन बैल आणि दोन चाकांची गाडी.
आजही ग्रामीण भागात शेतमाल तसच शेतीची अवजारं वाहून नेण्यासाठी बैलगाडीचा वापर केला जातो. मात्र येत्या काळात ही बैलगाडी कात टाकताना दिसणारंय. (sandeep pansare from maval did of applying hand brake to a bullock cart)

बैलगाडी म्हणजे शेतकऱ्याचा जीव की प्राण. कितीही अत्याधुनिक वाहनं आली तरी बळीराजा आजही शेतीच्या कामासाठी बैलगाडीचाच वापर करतो. विशेषत: पश्चिम महाराष्ट्रात साखर कारखान्यापर्यंत ऊस पोहचवण्यासाठी तसच कामगारांची वाहतूक करण्यासाठी ही बैलगाडी पुरेपुर उपयोगी ठरतेय. 

अलिकडच्या काळात बैलगाडीला अपघात होण्याचं प्रमाणही वाढलंय. मात्र आता काळजी करण्याचं कारण नाही. कारण बळीराजाच्या मर्सिडीजला आता वेसणीचा नव्हे तर खराखुरा ब्रेक लागणारंय. मावळमधील संदीप पानसरे यांनी चक्क बैलगाडीला हॅन्ड ब्रेक लावण्याची किमया साधलीय. यामुळे शेतक-यांना मोठा दिलासा मिळणार आहे. 

हँडब्रेकमुळे काय होईल?

बैलगाडी नियंत्रणात धावेल. बैलांना होणारा त्रास टळेल. उतारावर हँड ब्रेक फायदेशीर ठरेल. बैलगाडीला होणारे अपघात टळतील.  ऊसाने भरलेल्या गाड्या उतारावरही सहज थांबवणं शक्य होईल. 

राज्यातील बहुंताश ऊस काराखान्यांसाठी टायरच्या बैलगाडीतून ऊस वाहून नेला जातो. जवळपास 6 ते 7 कि.मी. अंतरावरून हा ऊस आणला जातो. यात रस्त्यावर अनेक चढ-उतार गाडी बैल हाकणाऱ्यांना आणि बैलांना मोठी तारेवरची कसरत करावी लागते.

मात्र आता हँडब्रेकमुळे हा सगळा त्रास संपणारंय. हा ब्रेक बैलगाडीला नवा दिशा देईल अशी आशा करायला हरकत नाही.