भाजपच्या माजी नगरसेवकाकडून विजय ताड यांच्या हत्येचा कट; आरोपींना कर्नाटकातून अटक

Sangali Muder Case: जतचे भाजपचे माजी नगरसेवक विजय ताड यांच्या हत्या प्रकरणात पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी चार जणांना अटक करण्यात आली असून, मुख्य आरोपी फरार आहे. पोलिसांकडून मुख्य आरोपीचा शोध सुरु आहे.

Updated: Mar 20, 2023, 05:38 PM IST
भाजपच्या माजी नगरसेवकाकडून विजय ताड यांच्या हत्येचा कट; आरोपींना कर्नाटकातून अटक title=

Sangli Murder Case: सांगली (Sangli News) जिल्ह्यातील जतचे माजी नगरसेवक विजय ताड हत्याप्रकरणी (Vijay Tad Case) मोठी अपडेट समोर आली आहे. विजय ताड यांच्या हत्येप्रकरणी सांगली पोलिसांनी (Sangli Police) पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे भाजपच्याच (BJP) नगरसेवकाने ताड यांच्या हत्येचा कट रचल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी थेट बेळगावातून चौघांना अटक केली आहे. तर मुख्य आरोपी अद्याप फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सांगली जिल्ह्यातील जतचे माजी नगरसेवक विजय ताड हत्या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगली पोलिसांनी याप्रकरणी आरोपी संदीप चव्हाण, निकेश मदने, आकाश व्हंनखंडे, किरण चव्हाण यांना कर्नाटकातून अटक केली आहे. तर उमेश सावंत फरार आहे. उमेश सावंत हे भाजपचे नगरसेवक आहेत. महत्त्वाचे म्हणजे मुख्य आरोपी उमेश सावंत यांच्या सांगण्यावरूनच ही हत्या करण्यात आली आहे.

सांगली जिल्ह्यातील जतचे माजी नगरसेवक विजय ताड यांच्यावर शुक्रवारी गोळ्या झाडून आणि दगडाने ठेचून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी माजी नगरसेवक उमेश सावंत यांचे नावही तक्रारीमध्ये होते. मृत विजय ताड यांचे भाऊ विक्रम ताड यांनी याप्रकरणी तक्रार दिली होते. विजय ताड नगरसेवक असताना उमेश सावंत यांनी त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अर्ज केला होता, असे फिर्यादित नमूद करण्यात आले होते. त्यामुळे विजय ताड आणि उमेश सावंत यांच्यात राजकीय संघर्ष होता हे समोर आलं आहे. मात्र ही हत्या नेमकी कोणत्या कारणामुळे झाली हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी तीन पथके रवाना केली आहेत.

पोलिसांनी काय सांगितले?

"17 मार्च रोजी जत येथे माजी नगरसेवक विजय ताड यांचा हत्याचारांचा वापर करुन खून करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन एकूण चार पथके गुन्ह्याच्या तपासासाठी लावण्यात आली होती. त्यातील एका पथकाने चार आरोपींना बेळगावमधून ताब्यात घेण्यात आल्यानंतर अटक करण्यात आली आहे. पाचवा आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध सुरु आहे. चारही आरोपी हे जत येथील आहेत. या प्रकरणाचा सखोल आणि बारकाईने तपास सुरु आहे. हत्येमागचे कारण अद्याप समोर आलेले नाही. पण फरार असेलल्या आरोपींने अटकेतल्या चौघांकडून गुन्हा घडवून आणला आहे असे दिसून येत आहे. घटनास्थळी तीन राऊंड फायर झाल्याचे समोर आले आहे. एक राऊंड गाडीमध्ये तर दोन राऊंड ताड यांच्या मृतदेहाजवळ फायर झाल्याचे समोर आले आहे. आरोपींकडून अद्याप शस्त्र जप्त करण्यात आलेले नाही," अशी माहिती पोलीस अधिक्षक बसवराज तेली यांनी दिली.