रवींद्र कांबळे, झी मीडिया, सांगली : शेतीचे कर्ज फेडण्यासाठी एका शेतकऱ्याला चक्क भीक मागण्याची वेळ आलीय. मुंबईच्या लोकलमध्ये हा शेतकरी भीक मागून कर्ज फेडण्यासाठी धडपड करतोय. नारायण पवार हे एक्स्प्रेस गाड्यांसह मुंबईच्या लोकलमध्ये आणि स्टेशन्सवर भीक मागतायत. कर्जबाजारी शेतकरी आहे, मला मदत करा अशी आर्त साद घालत ते फिरतायत. सांगली जिल्ह्यातील कवठे महंकाळ तालुक्यातील मोरगाव इथले हे शेतकरी आहेत. तिथं त्यांची पाच एकर शेती आहे. नारायण यांनी आपल्या शेतात ३ एकर डाळिंब, दीड एकरावर द्राक्ष बाग आणि अर्धा एकरावर शेवग्याचे पीक घेतले होते. ही बागायत उभी करण्यासाठी पवार यांनी बँकेतून कर्ज काढले होते. मात्र, सततचा दुष्काळ, पाणी नाही त्यातच निसर्गाची अवकृपा यामुळे पाण्याअभावी त्यांच्या बागा वाळून गेल्या. त्यामुळे शेतीतून एक रुपयांचेही उत्पन्न मिळालं नाही.
बँकेच्या कर्जाचा हप्ता आणि वाढते व्याज याची चिंता पवार यांना सतावू लागली. बँकेचे ४० लाखांचं कर्ज कसं फेडायचं अशा विवंचनेत ते होते. आत्महत्या केली तर आई-पत्नी आणि मुलांचं काय होईल अशी चिंता त्यांना होती. त्यामुळे हा आत्महत्येचा विचार सोडून त्यांनी भीक मागण्याचा निर्णय घेतला.
लेकावर भीक मागण्याची वेळ आल्याने पवार यांच्या आईला अश्रू रोखणं कठीण झालंय. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, सरकार बळीराजाचं आहे अशा वल्गना वारंवार केल्या जातात. मात्र लाखोंचा पोशिंदा असणाऱ्या बळीराजावर भीक मागण्याची वेळ येणं ही बाब महाराष्ट्रातील आणि रयतेच्या राजाच्या राज्यातील शोकांतिकाच म्हणावी लागेल.