सांगली लोकसभा निकाल 2024: विशाल पाटलांनी सांगली जिंकली; महाविकास आघाडीला धक्का

Sangli Lok Sabha Nivadnuk Nikal 2024: सांगलीमध्ये विकास पाटील यांचा विजय झाला असून जायंटकिलर ठरत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे.   

शिवराज यादव | Updated: Jun 4, 2024, 04:10 PM IST
सांगली लोकसभा निकाल 2024: विशाल पाटलांनी सांगली जिंकली; महाविकास आघाडीला धक्का title=

Sangli Lok Sabha Result 2024: सांगलीमध्ये विकास पाटील यांचा विजय झाला असून जायंटकिलर ठरत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. विकास पाटील यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील आणि भाजपाचे उमेदवार संजयकाका पाटील यांचा पराभव केला आहे. विशाल पाटील 1 लाख 1 हजार 94 मतांनी विजयी झाले आहेत. 

लोकसभा निवडणुकीचे उमेदवार ठरवताना महाविकास आघाडीमध्ये सांगलीमधील जागेवरुन वाद निर्माण झाला होता. उद्धव ठाकरे गटाने चंद्रहार पाटील यांच्या नावाची परस्पर घोषणा केल्याने काँग्रेसकडून नाराजी जाहीर करण्यात आली होती. यानंतर विशाल पाटील यांनी अपक्ष लढण्याची घोषणा केल्याने वाद निर्माण झाला होता. दरम्यान महायुतीने संजयकाका पाटील यांची उमेदवारी जाहीर केली. 

उद्धव ठाकरे यांनी सांगलीतील जाहीर सभेत चंद्रहार पाटील यांच्या नावाची घोषणा केली होती. जागावाटप अंतिम झालेलं नसतानाही उद्धव ठाकरेंनी घोषणा केल्याने महाविकास आघाडीतील मित्रपक्ष नाराज झाले होते. काँग्रेस नेत्यांनी जाहीर नाराजी बोलून दाखवल्यानंतर संजय राऊत यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं होतं. नंतर संयुक्त पत्रकार परिषद घेत अखेर काँग्रेसनेही चंद्रहार पाटील यांच्या नावाला दुजोरा दिला होता. पण यामुळे विशाल पाटील यांचे समर्थक नाराज झाले होते. सांगलीत पक्षाची ताकद असतानाही माघार घेतल्याने उघड नाराजी जाहीर कऱण्यात आली होती. यानंतर विशाल पाटील यांनी अपक्ष लढणार असल्याचं जाहीर केलं होतं.