Sanjay Raut Slams Devendra Fadnavis: निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव आणि घड्याळ हे पक्ष चिन्ह अजित पवार गटाला देण्याचा निर्णय मंगळवारी जाहीर केला. हा निकाल शरद पवार गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. या निकालावरुन राजकीय प्रतिक्रियांबरोबरच आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. अशातच या निकालावर टीका करणाऱ्यांना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर शब्दांमध्ये उत्तर देताना, 'जे लोकशाहीबद्दल बोलत आहेत त्यांनीच 2019 ला लोकशाहीचा मुडदा पाडला होता,' असा टोला लगावला. याच टीकेसंदर्भात उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना विचारलं असता त्यांनी कठोर शब्दांमध्ये फडणवीसांना उत्तर दिलं आहे.
लोकशाहीचा मुडदा पाडला या फडणवीसांच्या टीकेचा संदर्भ घेत संजय राऊत यांनी कठोर शब्दांमध्ये टीका केली. "निवडणूक आयोगाच्या गळ्यात मोदी-शाहांचा पट्टा आहे. हातात लोकशाहीची हत्या करण्यासाठी हत्यार आहे. निवडणूक आयोग ही एक सुपारीबाज संस्था आहे. मोदी-शाहांच्या सुपाऱ्या घेऊन ते राजकीय पक्षांमध्ये फूट पाडणाऱ्यांना प्रोत्साहन देते. राजकीय पक्षांचे खून करतेय. अशापद्धतीने निवडणूक आयोगाचं काम सुरु आहे. फडणवीस यांनी जरा अभ्यास करावा. स्वत:च्या पक्षाचं काय चाललंय ते पहावं. जसं राजकारण देशात घडवलं जात आहे ते देशातील संविधानिक संस्था, कायदा आणि राज्य व्यवस्थेला छेद देणारं आहे," असं राऊत म्हणाले. फडणवीसांच्या टीकेवर संतापून, "एवढं मी सांगू शकतो की, उद्या या देशात अराजक माजलं तर त्याची जबाबदारी डोळे मिटून दूध पिणाऱ्या फडणवीसांसारख्या सुज्ञ नागरिकांवर जाईल. याच फडणवीसांसारख्या मोदी-शाहांसारख्या वृत्तीमुळे या देशावर कधी मुघलांनी राज्य केलेलं तर कधी ब्रिटीशांनी राज्य केलं होतं, हे विसरु नये. महाराष्ट्रात त्यांनी जे गुंडाचं राज्य चालवलं आहे त्यावर त्यांनी गृहमंत्री म्हणून बोलावं," असा टोला राऊतांनी लगावला.
14 फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादीच्या अजित पवार गट विरुद्ध शरद पवार गटाच्या आमदार अपात्रता प्रकरणावर सुनावणी होणार असल्याचा संदर्भ देत यात काय होईल असं वाटतं असा प्रश्न राऊत यांना विचारण्यात आला. "जे शिवसेनेसंदर्भात घडलं ते राष्ट्रवादीबद्दल घडेल. निवडणूक आयोगाने लोकशाहीच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला आहे. लोकशाहीची पूर्ण हत्या करण्यासाठी हे प्रकरण आता राहुल नार्वेकरांकडे सोपवलं आहे. हा लोकशाहीचा वध असून तो निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्ष करत आहेत. ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे," असं राऊत म्हणाले.
नक्की वाचा >> 'राष्ट्रवादी अजित पवारांची' निकालावर फडणवीसांची 4 शब्दांत प्रतिक्रिया! म्हणाले, 'हा निर्णय..'
राष्ट्रवादी अजित पवारांची हा निकाल देण्यात आल्यानंतर पवारांची प्रतिक्रिया काय होती? असं संजय राऊतांना विचारण्यात आलं. त्यावर उत्तर देताना संजय राऊत यांनी, "ते अत्यंत संयमाने आणि खंबीरपणे उभे आहेत. आम्ही काल त्यांच्याबरोबर होतो. त्यांच्याशी या विषयावर चर्चा केली. उद्धव ठाकरेंप्रमाणेच कोणतंही वादळ आणि कोणतंही संकट अंगावर झेलून ठामपणे उभं राहण्याचा त्यांचा निर्धार आहे," असं राऊत म्हणाले. तसेच पुढे बोलताना, "काल फोनवर उद्धव ठाकरेंनी शरद पवारांबरोबर चर्चा केली. आपले कायदेशीर, तांत्रिक अनुभव त्यांनी शरद पवारांबरोबर शेअर केले," असंही सांगितलं.
नक्की वाचा >> ..म्हणून मोदी-शाहांनी राष्ट्रवादी अजित पवारांना दिली; संजय राऊतांचा दावा
शाहू महाराजांना राज्यसभेची उमेदवारी देऊन बिनविरोध निवडूण आणलं पाहिजे असंही राऊत म्हणाले. "संभाजी राजे स्वतंत्र व्यक्ती आहेत. त्यांच्या राजाकारणाबद्दल आम्ही कधी चर्चा केली नाही. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांचा विचार करुन सर्वांनी त्यांना बिनविरोध राज्यसभेवर पाठवावं अशी आमची इच्छा आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससहीत अन्य लहान पक्षांची आमच्याकडे 32 मतं आहेत. 8 मतं कमी पडत आहेत. आपण शाहू-फुले-आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतो. आपण छत्रपती शाहू महाराजांना राज्यसभेवर पाठवू शकतो का? शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांना या माध्यमातून बळ देता येईल का? यासंदर्भात चर्चा करत आहोत," असं राऊत यांनी म्हटलं. दरम्यान, "संभाजी राजे राजकारणात आहेत. त्यांनी पक्ष स्थापन केला आहे. मागील काही दिवसांमध्ये आमची त्यांच्याशी चर्चा झालेली नाही," असंही राऊत यांनी स्पष्ट केलं.