ईडापिडा टळो आणि....; कोरोनाला चिरडून पार पडली बगाड यात्रा, भाविकांचा उत्साह शिगेला

पिपाणी, हलगीचे सूर आणि गुलालाची उधळण...   

Updated: Mar 22, 2022, 11:20 AM IST
ईडापिडा टळो आणि....; कोरोनाला चिरडून पार पडली बगाड यात्रा, भाविकांचा उत्साह शिगेला  title=
व्हिडीओ स्क्रीनग्रॅब

सातारा : कोरोनाचं संकट आलं आणि जगण्याचे रंगच जणू फिरे पडले. जवळपास दोन वर्षे या विषाणूचं संकट सर्वांनी झेललं. अद्यापही या विषाणूचा प्रादुर्भाव पूर्णपणे ओसरलेला नाही. पण, तरीही घटलेलं कोरोना रुग्णांचतं प्रमाण पाहता काही नियम शिथिल झाले आणि गावोगावी पुन्हा एकदा ग्रामदेवतांच्या जत्रांचा उत्साह पाहायला मिळाला. (Satara Bawdhan bagad yatra)

संपूर्ण जगभरात प्रसिद्ध असणाऱ्या आणि आकर्षणाचा केंद्रबिंदू असणाऱ्या सातारा येथील बावधनमधील बगाड यात्राही यापैकीच एक. कोरोनानंतर या यात्रेचं मोठ्या स्तरावर आयोजन करण्यात आलं आणि तिथं एकच गर्दी उसळली. 

दोन वर्ष अतिशय कमी उत्साहात यात्रा पार पडली पण, यंदा गुलालही उधळला आणि हलगीवर सर्वांनी ठेकाही धरला. होळीच्या दिवसापासून सुरु झालेली ही यात्रा आज अखेरच्या टप्प्यावर आली आहे. 

रंगपंचमीच्या दिवशी इथं बगाड ओढण्याची प्रथा आहे. या बगाडाला खिल्लारी बैलांची जोडी जोडली जाते. दोन ते तीन टन वजनाचं हे बगाड ओढलं जातं. यानिमित्तानं नवस बोलले जातात आणि ते फेडण्यासाठी म्हणून इथं तोबा गर्दी होते. 

नवस पूर्ण झालेला व्यक्ती बगाडी म्हणून निवडत त्याला बगाडाला टांगलं जातं. या बगाड्याला बगाडावर बांधून मिरवणूक काढली जाते. नवस फेडायचा आहे ती व्यक्ती किंवा त्या व्यक्तीच्या वतीनं दुसरी एखादी व्यक्ती बगाडावर चढते. 

काशिनाथाचं चांगभलं, काळभैरवनाथाच्या नावानं चांगभलं... अशी आरोळी ठोकत हे बगाड वर जातं आणि ते ओढत पुढचे दोन अडीच तास ही मिरवणूक चालते. दगडाच्या चाकांवर बगाड लावत ते पुढं ओढलं जातं. दगडाचीच साखळीही या बगाडाला असल्याचं सांगण्यात येतं. 

साडेतीनशे वर्षांपूर्वीची ही प्रथा पाहताना अंगावर काटा येतो आणि नकळत आपणही या गुलालाच्या उधळणीत रंगून जातो. दरवर्षी बगाडाचा 15 किंवा त्याहून जास्त बैलजोडी जोडण्याची परंपरा आहे. 

यंदाच्या वर्षी बगाड्या होण्याचा मान शेलारवाडी इथल्या बाळासाहेब मांढरे यांना मिळाला आहे. पूजाअर्चा झाल्यानंतर त्यांना बगाडावर चढवण्यात आलं. ज्यानंतर 15 बैलांनी हे बगाड ओढलं आणि ही यात्रा, मिरवणूक शेतांमधून निघाली. बगाड आपल्या शेतातून जाणं हेसुद्धा भाग्य असल्याची इथल्या गावकऱ्यांची समजूत आहे. 

नदीकाठावर बगाडाची पूजा केल्यानंतर पालखी आणि त्यानंतर बगाड्याची पूजा करत बगाड यात्रा प्रस्थान करते. अतिशय महत्त्व असणारी आणि थक्क करणारी ही यात्रा एकदातरी अनुभवावी अशीच आहे.