Satara Ladies Toilet Horror: साताऱ्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. शहरातील मुख्य ठिकाणांपैकी एक असलेल्या रविवार पेठेमध्ये सोमवारी रात्री अचानक विद्रूप चेहरा असलेली महिला दिसल्याने एकच गोंधळ उडाला. या भागातील वीजपुरवठा खंडित झाल्याने काही काळ येथे संपूर्ण काळोख पसरला होता. अशातच शौचालय वापरण्यासाठी गेलेल्या माहिलांना शौचालयामध्ये ही विचित्र आकृती दिसल्याने महिलांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. पाहता पाहता ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि या विद्रूप महिलेची चर्चा शहरभर होऊ लागली. मात्र सत्य समोर आल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. नेमकं घडलं काय पाहूयात...
झालं असं की, सोमवारी रात्री शहरातील रविवार पेठे येथील महिलांच्या शौचालयामध्ये एका महिलेची आकृती दिसून आली. वीज पुरवठा खंडित झालेला असताना बॅटरीच्या प्रकाशामध्ये शौचालयाचा वापर करण्यासाठी काही महिलांनी इथं प्रवेश केला. वीज नसताना बॅटरीच्या प्रकाशात आत प्रवेश केल्यानंतर या महिलांची भीतीने गाळण उडाली. शौचालयाच्या दारापासून काही फूट अंतरावर असलेल्या बेसिनजवळ एका महिलेची आकृती गुडघ्यांवर डोकं ठेऊन पांढरं कापड शरीराभोवती गुंडाळून बसल्याचं दिसून आलं. अंधारामध्ये हे असं कोण बसलं आहे याचा विचार करण्याची उसंतही हे दृष्य पाहणाऱ्या महिलांना मिळाली नाही. समोरचं दृष्य पाहून घाबरलेल्या महिला शौचालयाबाहेर पळाल्या. माहिला किंकाळत बाहेर आल्या आणि त्यांनी घडलेला प्रकार गोळा झालेल्या लोकांना सांगितला. ही भूताटकी आहे की इतर काही अशी चर्चाही दबक्या आवाजात सुरु झाली.
आधीच अंधार आणि त्यातही अशा अवस्थेत महिलांच्या शौचलायामध्ये गुडघ्यामध्ये डोकं घालून पांढऱ्या वस्त्रातील बाई बसल्याची बातमी शहरात वाऱ्यासारखी पसरली. शौचालयातील एका कोपऱ्यामध्ये विद्रूप चेहऱ्याची महिला दिसल्याची बातमी वणव्याप्रमाणे पसरल्यानंतर शौचालयाबाहेर गर्दी जमा झाली. स्थानिक नागरिकांनी या शौचालयात बॅटरीच्या उजेडात येऊन पाहणी केली. काही तरुणांनी एकत्र या शौचालयामध्ये प्रवेश केला. त्यांनी महिलांनी सांगितलेल्या ठिकाणी बॅटरीच्या प्रकाशात शोध घेतला असता खरोखरच तिथे एका महिलेची आकृती दिसली. फार हिंमत करुन या तरुणांनी काठीच्या सहाय्याने या आकृतीला हलवण्याचा प्रयत्न केला असता ती आकृती खाली पडली. त्यावेळेस हा मृतहेद आहे की काय अशी शंका उपस्थित करण्यात आली.
या आकृतीच्या जवळ जाऊन नीट पहाणी केली असता कोणीतरी खोडसाळपणे कपड्याच्या दुकानातील पुतळ्याला म्हणजेच मॅनेक्यूला पांढरी चादर गुंडाळून त्या ठिकाणी बसवल्याचे निदर्शनास आले. याविषयी स्थानिक महिलांनी अशी जीवघेणी मस्करी करणाऱ्यांविरोधात कडक कारवाईची मागणी केली आहे