तुषार तपासेसह, अहमद शेख झी मीडिया, सोलापूर : राजाचाच मुलगा राजा होण्याचे दिवस गेले... आता जो लायक आहे तोच राजा होणार... लोकशाहीत सरकारी अधिकारी रूपातला राजा होण्यासाठी आधी क्षमता सिद्ध करावी लागते. राज्यातल्या तळागाळातल्या होतकरू तरूणांनी प्रचंड मेहेनतीने स्वतःची क्षमता सिद्ध करत, UPSC चं अधिकारीपद मिळवलं आहे. त्यावरचाच हा विशेष वृत्त्तांत.
साता-यातील आरफळ गावातील हा प्रथमेश पवार-पाटील. प्रथमेशची आई, काकी आणि इतर महिलांनी त्याचं औक्षण केलं. सर्वांनी त्याला पेढे भरवले. प्रथमेशचं असं कौतुक होण्याचं कारणही खास आहे. प्रथमेशने UPSC च्या सेंट्रल आर्म्ड पोलीस फोर्स असिस्टंट कमांडंट परीक्षेत संपूर्ण देशात तिसरा तर महाराष्ट्रातून प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. छोट्याशा गावातील प्रथमेशने खडतर परिश्रम घेत, हे उज्ज्वल यश मिळवलं आहे. त्यामुळे त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्याचं माध्यमिक शिक्षण साता-यात आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंगपर्यंतचं शिक्षण पुण्यात झालं. नंतर दोन वर्ष जीवतोड मेहेनत घेत प्रथमेशनं हे घवघवीत यश मिळवलं आहे.
पोरानं आपल्या कष्टांचं चीज केल्याचा आनंद, प्रथमेशच्या आई-वडिलांच्या तोंडावरून ओसंडून वाहत आहे. सोलापूरमधील बार्शी तालुक्यातील तडवळे गावचा शरण कांबळे हा सुद्धा याच परीक्षेत, देशात आठवा आला आहे. विशेष म्हणजे शरणने हे उत्तुंग यश पहिल्याच प्रयत्नात मिळवलं आहे. बारावीपर्यंत आईबरोबर भाजी विकायला जाणा-या शरणनं स्वकर्तृत्वानं यशाचा मोठा पल्ला गाठला आहे.
आपल्या मुलानं मोठा साहेब व्हायचं स्वप्न शरणच्या आई-वडिलांनी पाहिलं होतं. आणि शरणला ते स्वप्न पूर्ण करता यावं यासाठी त्यांनी मजुरीची कामं केली होती. आज त्यांचा उर आपल्या मुलाच्या यशानं भरून आला आहे. शुन्यातून विश्व निर्माण करणारे प्रथमेश पवार-पाटील आणि शरण कांबळे हे खरे हिरो आहेत. म्हणूनच काही तरी भव्य करून दाखवणा-या तरूणाईचे ते आदर्श ठरतात.