मुंबई / सांगली : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ४०० वर्षांपूर्वीच्या वटवृक्षाला जीवदान दिले आहे. यासाठी त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले आहेत. रत्नागिरी - नागपूर महामार्गाचे काम सुरु आहे. सांगलीतील मिरज तालुक्यात भोसे गावाजवळ महामार्गालगत ४०० वर्षांपूर्वीचा एक वटवृक्ष आहे. मात्र, रस्ता रुंदीकरण कामात हा वटवृक्ष अडथळा होत होता. तो तोडण्यात येणार होता. मात्र, ४०० वर्षांपूर्वीचा वृक्षतोडू नका, अशी मागणी होत होती. महामार्गाचे काम सुरु असताना अनेक वृक्षांची तोड करण्यात आली होती. त्यामुळे हाही वटवृक्ष तोडणार असल्याचे समजताच वृक्षप्रेमींना तो वाचविण्यासाठी प्रयत्न सुरु केले.
महामार्गावरील ४०० वर्ष जुन्या वटवृक्षा प्रकरणी महत्त्वपूर्ण तोडगा निघाला आहे. या हायवेच्या सर्व्हिस रोडसाठी पर्याय काढून हा वटवृक्ष वाचवण्याचा निर्णय महामार्ग प्राधिकरणाने घेतला आहे. महामार्गाची रचना थोडीशी बदलून बायपास रस्त्याला पर्याय शोधण्याचा निर्णय नॅशनल हायवे ऑथोरिटी ऑफ इंडिया (एनएचएआय) आणि दिलीप बिल्डकॉन या रस्ता बांधणी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतला आहे. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यापर्यंत हा विषय गेल्यावर त्यांनी तात्काळ केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याशी पत्रव्यवहार केला होता. अखेर काल नितीन गडकरी यांच्या कार्यालयातून या वटवृक्षप्रकरणी मार्ग काढण्याचे आदेश एनएचएआयच्या अधिकाऱ्यांना प्राप्त झाले.
आदित्य ठाकरे यांनी यासंदर्भात ट्वीट करुन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले आहेत. "एनएचएआयच्या अधिकाऱ्यांनी इथे भेट देऊन ४०० वर्ष जुन्या वटवृक्षाची पाहणी केली, असे मला समजले. त्यानंतर महामार्गावरील बायपास रस्त्याला पर्याय शोधण्याचा निर्णय झाला. त्यामुळे हा वृक्ष वाचला आहे. माझ्या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद दिल्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मी आभार मानतो. ज्यांनी हा मुद्दा निदर्शनास आणला आणि हे वृक्ष वाचवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांचेही ही आभार मानतो, असे आदित्य ठाकरे यांनी ट्वीट केले आहे.
I’ve been informed that the NHAI has visited the 400 yr old Banyan Tree in Sangli and has begun reworking on the reallignment of the Highway, so as to save the tree.
I’m truly thankful to Union Minister @nitin_gadkari ji for positively responding to my request on this (1/2)— Aaditya Thackeray (@AUThackeray) July 22, 2020
हा वटवृक्ष वाचविण्यासाठी ग्रामस्थ आणि पर्यावरणप्रेमी सरसावले होते. ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांच्या सह्याद्री देवराई परिवाराने वटवृक्ष तसाच ठेवून त्याच्या शेजारुन रस्ता करावा, अशी मागणी करत आंदोलनाची हाक दिली होती. या महाकाय वटवृक्षानजीक पर्यावरण प्रेमींनी एकत्र येत सोशल डिस्टन्स ठेवत प्रतिकात्मक 'चिपको आंदोलन'ही केले होते. पर्यायी मार्गाने रस्ता करुन हा वटवृक्ष वाचवावा अशी मागणी त्यांनी केली होती. त्यांची ही मागणी मान्य झाली असून वटवृक्षाला जीवदान मिळाले आहे.
हा वटवृक्ष पंढरपूरच्या वारीसाठी पायी जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी हक्काचे सावली देणारे ठिकाण आहे. विठ्ठलाच्या दर्शनाला जाणारे प्रत्येक वारकरी या वटवृक्षाच्या सावलीखाली विसावतो. मिरज-पंढरपूर मार्गावरुन दरवर्षी विठ्ठलाच्या भेटीला शेकडो पालख्या जात आसतात. यातील बहुतांश पालख्याचा मुक्काम या वटवृक्षाखाली वर्षांनुवर्षे होत राहिला आहे. पांडुरंगाच्या दर्शनाला जाणाऱ्या शेकडो वारकऱ्यांना सावली देणारा हा वटवृक्ष आता वाचला आहे.