Mumbai Crime News: ऑनलाइन जुगार खेळण्याचा नाद लागलेल्या एका बँक मॅनेजरनेच बँकेचे लॉकर फोडून त्यातील सोनं-नाणं चोरी करून विकल्याचा धक्कादायक प्रकार भांडुप पश्चिम येथे उघडकीस आला आहे. या प्रकरणी भांडुप पोलिसांनी बँक मॅनेजर आणि सोनं विकण्यास मदत करणारा असे दोन जणांना अटक केली आहे. मनोज म्हस्के असे या मॅनेजर चे नाव असून फरीद शेख असे दुसऱ्या अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
मनोज म्हस्के हा एसबीआय (SBI) बँक मुलुंड शाखेच्या पर्सनल ब्रांच सर्व्हिसमध्ये मॅनेजर म्हणून नोकरीला होता. तर शेख याने मनोजला सोनं विकण्यास मदत करीत होता. मुलुंड - नाहूर येथील रूनवाल ग्रीन या ठिकाणी असलेल्या एसबीआयच्या शाखेत प्रशासक म्हणून काम करणारे अमित कुमार यांनी भांडुप पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार बँकेत ग्राहकांनी सोनं गहाण ठेवून घेतलेल्या कर्जातील जवळपास ३ कोटी रुपयांचे सोनं बँकेच्या लॉकर मधून गहाळ झाल्याचे समोर आले आहे. या लॉकरच्या दोन चाव्या आहेत आणि फक्त दोन्ही चाव्यांनेच लॉकर उघडता येतात, त्यापैकी एक सर्व्हिस मॅनेजरकडे असते आणि दुसरी शाखेत कॅश इनचार्ज म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीकडे असते.
२७ फेब्रुवारी रोजी मनोज म्हस्के रजेवर असताना प्रशासक अमित कुमार यांच्याकडे लॉकरची जबाबदारी होती. कुमार लॉकरमध्ये रोख रक्कम आणि दागिने जमा करण्यासाठी गेले असता त्यांना सोन्याच्या दागिन्यांची अनेक पाकिटे गायब असल्याचे दिसले. त्यांनी कागदपत्रे व्यवस्थित तपासली असता. बँकेच्या या शाखेने सोनं तारण ठेवून ६३ ग्राहकांचे सोनं तारण ठेवून कर्जे दिली होती. लॉकर मध्ये असलेल्या ६३ सोन्याच्या पाकिटांपैकी ५९ पाकिटे गहाळ झाली होती व लॉकरमध्ये केवळ ४ पाकिटे शिल्लक होती. अमित कुमार यांनी ही बाब बँकेच्या वरिष्ठ अधिकारी यांच्या लक्षात आणून दिली.
बँक अधिकारी यांनी सुट्टीवर असलेल्या सर्व्हिस मॅनेजर मनोज म्हस्के याला तातडीने बँकेत बोलावून त्याच्याकडे गहाळ झालेल्या सोन्याच्या पाकिटाबाबत चौकशी केली असता त्यांनी ती त्यानेच गहाळ केल्याची कबुली देत यापैकी काही सोनं दुसरीकडे तारण ठेवले तर काही सोन विकल्याची कबुली दिली. मी लवकरच सोन परत करतो असे बोलून त्याने बँकेकडे वेळ मागून घेतला. परंतु बँकेने त्याला कुठलाही वेळ न देता भांडुप पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
भांडुप पोलिसानी भादंवि कलम ४०९ अन्वये गुन्हा दाखल करून मनोज म्हस्के आणि त्याचा साथीदार शेख याला अटक करण्यात आली. पोलिसांनी केलेल्या चौकशीत आढळून आले आहे की, म्हस्के याला ऑनलाइन सट्टा खेळण्याची सवय आहे. या व्यसनातूनच त्याने थेट बँकेतून सोनं चोरी केलं. म्हस्के याने सोनं कुठे गहाण ठेवले याबद्दल पोलीस तपास करीत आहेत.