Maharashtra Weather News : देशातील उत्तरेकडे असणाऱ्या राजच्यांसह देशाची राजधानी असणाऱ्या दिल्ली आणि एनसीआर क्षेत्रामध्येही थंडीचा कडाका वाढला आहे. आयएमडीच्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये दिल्लीसह हरियाणा, पंजाब या भागांमध्ये धुक्याची चादर अडचणी वाढवण्याचं कारण ठरेल. या प्रणालीचे थेट परिणाम देशातील इतर राज्यांमध्येही दिसणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.
महाराष्ट्रात उत्तरेकडील या थंडीचा थेट परिणाम दिसत असून, बहुतांश भागांमध्ये तापमान 10 अंशांहून कमी झालं आहे. धुळ्यामध्ये राज्यातील निच्चांकी तापमानाची नोंद करण्यात आली असून, इथं पारा 4 अंशांवर स्थिरावला आहे. तर, मराठवाडा आणि विदर्भसुद्धा या थंडीला अपवाद नाहीत. लातूरमध्ये असणाऱ्या बोरगावात दवबिंदू गोठून त्यांचं हिमकणात रुपांतर झालं आहे, ज्यामुळं राज्यात थंडीच्या लाटेनं आणखी तीव्र रुप धारण केल्याचं स्पष्ट होत आहे.
हवामान विभागाच्या निरीक्षणानुसार उत्तर भारतातील अतीव उत्तरेकडे असणाऱ्या पर्वतरांगांमध्ये जोरदार बर्फवृष्टीला सुरूवात झाली असून, त्या दिशेनं येणाऱ्या शीत लहरींमुळे संपूर्ण महाराष्ट्र गारठला आहे. पुढील 48 तासांपर्यंत ही थंडीची लाट कायम राहणार असून, विदर्भ आणि मराठवाडा यामुळं सर्वाधिक प्रभावित क्षेत्र ठरणार आहे. कोकण किनारपट्टी क्षेत्र आणि पश्चिम महाराष्ट्रसुद्धा या लाटेच्या विळख्यात येताना दिसणार आहे.
सोमवारी पुण्यात किमान तापमानाचा आकडा 7 अंशांवर पोहोचला होता. तर, महाबळेश्वरपेक्षाही साताऱ्यात जास्त थंडीची नोंद करमअयात आली. पाचगणी, वाई इथंही थंडीचा कडाका वाढल्याचं लक्षात आलं. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये दिवस मावळतीला जात असताना तापमानात घट नोंदवण्यात येत आहे. पुढील काही दिवस वातावरणाची ही स्थिती कायम राहणार असल्याचा स्पष्ट इशारा हवामान विभागानं दिला आहे.
IMD नं जारी केलेल्या इशाऱ्यानुसार 17 डिसेंबरपासून शीतलहरीला सुरुवात होणार असल्यामुळं कमाल तापमानातही घट नोंदवली जाणार आहे. 18 डिसेंबरपर्यंत बहुतांश भागांमध्ये तापमान 4 अंशांवर पोहोचणार आहे. 20 डिसेंबरनंतर हवामानात पुन्हा बदल अपेक्षित असून, पुन्हा एकदा किमान तापमानात घट होण्यास सुरुवात होणार आहे.