Maharashtra Schools Start Date: दहावी आणि बारावी बोर्डाच्या (SSC, HSC Board Exams) परीक्षा संपल्यानंतर आता महाराष्ट्रात इयत्ता पहिली ते नववीच्या वार्षिक परीक्षांना सुरुवात झाली आहे. काही शाळांमध्ये वार्षिक परीक्षा मध्यावर आल्या आहेत, तर काही शाळांच्या परीक्षा आता कुठं सुरू झाल्या आहेत. विद्यार्थ्यांचं लक्ष मात्र शेवटच्या पेपरकडेच आहे. कारण, परीक्षा संपल्यानंतर सुरु होतेय ती म्हणजे उन्हाळी सुट्टी.
दणक्यात उन्हाळी सुट्टी (Summer Vacation) गाजवण्यासाठी सज्ज असणाऱ्या प्राथमिक आणि माध्यमिक शालेय विद्यार्थ्यांसाठी याच उत्साही वातावरणात एक महत्त्वाची आणि मोठी माहिती समोर आली आहे. ही माहिती आहे, शाळा पुन्हा कधी सुरु होणार यासंदर्भातील.
यंदाच्या वर्षी 2 मे 2023 पासून महाराष्ट्रातील माध्यमिक आणि प्राथमिक शाळांना सुट्ट्या सुरु होणार आहेत. या उन्हाळी सुट्ट्या थेट जून महिन्यात संपणार आहेत. जिथं 12 जून 2023, हा नव्या शैक्षणिक वर्षासह शाळेचा सुट्टीनंतरचा पहिला दिवस असणार आहे.
विदर्भात उन्हाची तीव्रता पाहता शाळा 26 जूनपासून सुरु होती अशी माहिती देणारं परिपत्रक राज्याच्या शिक्षण विभागाकडून जारी करण्यात आलं आहे. इयत्ता पहिली ते नववीपर्यंतच्या वार्षिक परीक्षांचे निकाल 30 एप्रिलपर्यंतच्या कालावधीत लागणार आहेत. काही शाळांचे निकाल पोस्टानं घरी येतील, तर काही शाळांचे निकाल घेण्यासाठी विद्यार्थी/ पालकांना शाळांमध्ये जावं लागणार आहे.
कोरोना काळ, शैक्षणिक वर्षात आलेले व्यत्यय पाहता, शाळांच्या यंदाच्या वर्षीच्या उन्हाळी सुट्ट्या तुलनेनं कमी करण्यात आल्या आहेत. किंबहुना यंदाच्या संपूर्ण शैक्षणिक वर्षात सुट्य्यांचा आकडा 76 पेक्षा कमी असेल याची काळजी घेण्याचं आवाहनही शिक्षण अधिकाऱ्यांना करण्यात आलं आहे.
पहिली ते नववी इयत्तांमध्ये शिकणाऱ्या विद्यांर्थ्यांच्या परीक्षांचे निकाल यंदा लवकरच लागणार असून, त्यानंतर एक ते दीड महिन्याच्या सुट्टीचा आनंद विद्यार्थ्यांना घेता येणार आहे. दहावी आणि बारावीच्या निकालांबाबत सांगावं तर, संपाचे कोणतेही परिणाम या निकालांवर पडणार नसल्याचं स्पष्ट होत आहे. 10 जूनपर्यंत दहावीचे निकाल लागतील अशी माहिती शिक्षण मंडळाकडून मिळत आहे, तर बारावीचे निकाल मे महिन्याचा अखेरचा आठवडा किंवा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये लागणार आहेत. त्यामुळं विद्यार्थ्यांनो मिळतेय तितक्या सुट्टीचा आनंद घ्या आणि नव्या वाटचालीसाठी तयारीला लागा....