Maha Vikas Aghadi Morcha in Thane : ठाकरे गटाच्या युवा सेनाच्या पदाधिकारी रोशनी शिंदे मारहाण प्रकरणात (Roshni Shinde Beating Case) पोलिसांनी कारवाई न केल्यानं महाविकासआघाडी आक्रमक झाली आहे. आज महाविकासआघाडीकडून ठाणे पोलीस आयुक्तलयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ठाणे शिवाजी मैदान ते पोलीस आयुक्त कार्यलाय पर्यत मोर्चा काढण्यात येणार आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड, काँग्रेस पक्षाचे नेते विक्रांत चव्हाण तसेच खासदार विनायक राऊत, राजन विचारे सहभागी होणार आहेत.
विरोधी पक्षाच्या लोकांवर हल्ले करण्यात येत आहेत. मात्र, पोलिसांकडून साधी कारवाई करण्यात येत नाही. ठाणे पोलिसांच्या निष्क्रिय आणि पक्षपाती कारभाराविरोधात महाविकास आघाडीचे नेते आज बुधवारी ठाण्यात मोर्चा काढणार आहेत. विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांवर हल्ले होत असताना पोलीस बघ्याची भूमिका घेत आहेत. या मोर्चाद्वारे ठाण्यातील पोलिसांच्या निष्क्रियतेचा निषेध करण्यात येणार आहे. ठाणे पश्चिमेकडील शिवाजी मैदानापासून दुपारी 3 वाजता या मोर्चाला सुरुवात होणार आहे. तिथून ठाण्याच्या पोलीस आयुक्तालयावर हा मोर्चा धडकणार आहे.
माझ्या जीवाचे बरे वाईट झाल्यास जबाबदार कोण?; रोशनी शिंदे यांचा सवाल, उद्धव ठाकरेंकडून विचारपूस
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संदर्भात फेसबुकवर पोस्ट लिहिली म्हणून ठाकरे गटाच्या युवा सेनेच्या पदाधिकारी रोशनी शिंदे यांना शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी मंगळवारी जोरदार मारहाण केली. या मारहाणीत जखमी झालेल्या रोशनी शिंदे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे थेट रुग्णालयात गेले होते. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्यावर जोरदार हल्लाबोल चढवला. निष्क्रीय गृहमंत्री असल्याचा ठपका ठाकरे यांनी ठेवला.
मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात पुन्हा राडा, ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याला शिंदे गटाकडून मारहाण
रोशनीची विचारपूस केल्यानंतर उद्धव ठाकरे हे ठाण्यातील पोलीस आयुक्तालयात गेले होते. मात्र, तिथे पोलीस आयुक्तच उपस्थित नव्हते. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्ला चढवला. ठाण्यातील पोलीस साधा एफआयआर नोंदवत नसल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत पोलीस आयुक्तांना हटविण्याची मागणी केली.