राजकारणी थापा मारतायेत! वर्ष अखेरपर्यंत भारतात संपूर्ण लसीकरण शक्य नाही

'मी लस विकून पैसे बनवायला बसलो नाही मात्र लोकांनी लस घ्यावी' असं आवाहन सायरस पुनावाला यांनी केलं आहे

Updated: Aug 13, 2021, 04:32 PM IST
राजकारणी थापा मारतायेत! वर्ष अखेरपर्यंत भारतात संपूर्ण लसीकरण शक्य नाही title=

पुणे : राजकारणी थापा मारत आहेत, वर्षाच्या अखेपर्यंत भारतात संपूर्ण लसीकरण (Vaccination) होणे शक्य नाही, असं रोखठोक उत्तर सायरस पुनावाला (Cyrus Poonawalla) यांनी दिलं आहे. आम्ही महिन्याला 10 कोटी लसींचं उत्पादन घेतलं आहे. यामध्ये कोट्यवधी रूपयांची गुंतवणूक केली आहे. महिन्याला 10 कोटी प्रमाणे वर्षाला 110 ते 120 कोटी होतील, असं पुनावाला यांनी म्हटलं आहे.  

पुण्यातील टिळक स्मारक ट्रस्ट तर्फे देण्यात येणारा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार यावर्षी सिरम इन्स्टिट्यूटचे संस्थापक (serum institute of india) तसंच पूनावाला ग्रुपचे चेअरमन सायरस पूनावाला यांना प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमात त्यांना लस निर्यातीच्या मुद्यावर टिप्पणी केली. कोरोनावरची (Corona) लस निर्यात बंद केल्यानं सायरस पुनावाला यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अनेक देशांनी आम्हाला ऍडव्हान्स पेमेंट केलं असल्याचं पुनावाला म्हणाले. 

कोविशिल्ड (Covishield) ही जगातील सर्वात स्वस्त लस आहे. अतिशय माफक दरात आम्ही ही लस देत आहोत, असं सायरस पुनावाला यांनी म्हटलं आहे. 

कोरोनामुळे मृत्यू होण्याचं प्रमाण फार कमी आहे, त्यामुळे लॉकडाऊन लावला जाऊ नये अशी भूमिका मांडतानाच पुनावाला यांनी लोकांमध्ये हर्ड इम्युनिटी तयार व्हायला हवी असं मत व्यक्त केलं. मी लस विकून पैसे बनवायला बसलेलो नाही. मात्र लोकांनी लस घ्यावी, असं आवाहन त्यांनी केलं.

कोविशिल्ड लहान मुलांना देणं धोकादायक ठरू शकतं, त्यामुळे 18 वर्षांखालील मुलांना कोविशिल्ड देणार नाही, असं पुनावाला यांनी म्हटलं आहे. तसंच कोरोनाची तिसरी लाट इतकी गंभीर नसेल असं मतही सायरस पुनावाला यांनी व्यक्त केलं आहे.