अमर काणे / नागपूर : एका सात वर्षांच्या मुलाने चार महिन्यांपूर्वी एक रूपयाचं नाणं गिळलं. गेल्या चार महिन्यांपासून हे नाणं या मुलाच्या पोटात होतं. अखेर नागपूरच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी दूर्बिणीद्वारे विनाशस्त्रक्रिया हे नाणं पोटातून बाहेर काढलं. नाणं वितळण्यास सुरुवात झाली होती. नाणं पूर्ण वितळलं असतं तर जीवाला धोका होता.
हा आहे सात वर्षांचा मुलगा शेख अरबाज.अमरावती जिल्ह्यातल्या अचलपूर तालुक्यातल्या भोगावचा. गतीमंद असलेल्या शेख अरबाजने चार महिन्यांपूर्वी घरात खेळता खेळता एक रूपयाचं नाणं गिळलं. पोटात नाणं असल्याचं त्याचं पोट दुखत होतं. उलट्या होत होत्या. पण उपचार होत नव्हते.
अखेर चार महिने उलटल्यावर गेल्या आठवड्यात त्याचं पोट दुखणं वाढलं. त्याच्या पोटातलं नाणं वितळण्यास सुरूवात झाली होती. अखेर अरबाजला त्याचे पालक अमरावतीच्या इर्विन हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. पण त्याला असह्य वेदना सुरू झाल्यावर आई वडिलांनी नागपूरच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा रस्ता धरला.
सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या पोटविकार विभागाचे प्रमुख डॉ. सुधीर गुप्ता यांनी त्याला तपासलं. एक्स रे काढल्यानंतर पोटात नाणं असल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर एन्डोस्कोपी बास्केटच्या मदतीने ते नाणं बाहेर काढण्याचा निर्णय झाला आणि दुर्बिणीद्वारे रूतून बसलेलं ते नाणं बाहेर काढण्यात आलं. पोटातून नाणं बाहेर काढल्यावर आता त्याच्या चेहऱ्यावर आनंदाचं वातावरण आहे.