वाल्मिक जोशी, झी मीडिया, जळगाव : मुंबई ड्रग्स प्रकरणात (Mumbai Drugs Case) दररोज नवनवे खुलासे होत आहेत. अभिनेता शाहरुख खानचा (Shahrukh Khan) मुलगा आर्यन खानला (Aryan Khan) ड्रग्स प्रकरणात अटक केल्यानंतर या प्रकरणात अनेक नावं समोर आली आहेत. आता या प्रकरणात आणखी एका व्यक्तीने उडी घेतली आहे. आर्यनप्रकरणात जळगावचा हॅकर मनिष भंगाळेनं (Manish Bhangale) खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे.
शाहरुख खानची मॅनेजर पुजा ददलानी (Pooja Dadlani) हिचा सीडीआर काढण्यासाठी 5 लाख रुपयांची ऑफर आल्याचं भंगाळेनं दावा केला आहे. या प्रकरणातल्या काही पुराव्यांशी छेडछाड करायलाही सांगितल्याच्या दावा त्याने केला आहे. याप्रकरणी मनिष भंगाळेनं मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहून चौकशीची मागणी केली आहे.
एकनाथ खडसे यांच्याविषयी खळबळ जनक खुलासे करणाऱ्या हॅकर मनीष भंगाळे यांनी पुन्हा एकदा आर्यन खान प्रकरणात खळबळजनक खुलासा करत संपूर्ण देशाचे लक्ष आपल्या कडे वेधून घेण्याचा प्रयत्न केला आहे
मनीष भंगाळे यांनी म्हटल आहे की सहा ऑक्टोबर रोजी आपल्याला दोन व्यक्ती भेटायला आल्या होत्या. यामध्ये एकाच नाव होतं आलोक जैन, शैलेश चौधरी अशी त्यांची नावे होती. या दोन्ही व्यक्तींनी आपल्याला तीन कामं सांगितली. यात त्यांच्याकडे असलेल्या आठ ते दहा मोबाईल नंबरचा सिडीआर काढून पाहिजे होता. त्यात एक पूजा ददलाणी नावाने होता, दुसरा नंबर होता त्याच्या व्हॉट्सअॅप चॅटमध्ये त्यांना त्यांच्या पद्धतीने बदल करून हवा होता. हा व्हॉट्सअॅप चॅट आर्यन खान नावाने होता. तिसरं काम म्हणून त्यांनी प्रभाकर साईल नावाने बनवाट सिम कार्ड काढून द्यावे अशी मागणी त्यांनी माझ्याकडे केली होती. यासाठी मला पाच लाखांची ऑफर मला देण्यात आली. यातले दहा हजार रुपये बळजबरीने माझ्या हातात देण्यात आले, असा दावा भंगाळे यांने केल आहे.
मात्र हे काम मी केलं नाही, त्यांनी हे काम दुसऱ्या मार्फत केलं असावं. कारण, दोन दिवसांपूर्वी प्रभाकर साईल यांचं नाव समोर आलं आणि माझ्या लक्षात आलं की प्रभाकर साहिल यांच्या नावाने बनावट सिम काढून त्याचा दुरुपयोग केला जाऊ शकतो. आणि यातून प्रभाकर साईल याच्या जीवाला ही धोका निर्माण होऊ शकतो अस मला वाटू लागल्याने मी याची माहिती शासनाला व्हावी यासाठी समोर आलो असून तपास यंत्रणांनी मी सांगत असलेल्या माहिती प्रमाणे ही तपास करावा अस वाटतं, असं मनीष भंगाळे याने म्हटलं आहे.
या प्रकरणात आर्यन खान ही अडचणीत येऊ शकतो अस मला वाटतं. कारण त्याच्या नावाने असलेले व्हॉट्सअॅप चॅट जर बदलले असतील तर त्याचा दुरुपयोग करून आर्यन खान अडचणीत आणण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं भंगाळे यांनी म्हटलं आहे.
या सगळ्या प्रकरणात प्रभाकर साईल याचा मनसुख हिरेन होऊ नये असं आपल्याला वाटत असल्याने आपण या प्रकरणात शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी समोर आलो असून आपण या प्रकरणी राज्य गृहमंत्री, केंद्रीय गृह मंत्री आणि कमिशनर यांना लेखी कळविलं आहे. असंही मनीष भंगाळे यांनी सांगितलं.