जालना : जालन्यात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात शरद पवारांनी पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांवर तोंडसुख घेतलं. विकास करण्यासाठी पक्ष सोडून गेलेल्यांना निवडणुकीत मतदारांनी मत दिल्यानंतर विकास काय आहे. हे कळेल असं म्हणत तोंडसुख घेतलं. भाषणाच्या शेवटी पवारांनी माजी खासदार पुंडलीकराव दानवे यांना जवळ बोलावून घेत त्यांचा हात हातात घेत आम्ही आता म्हातारे झालो आहे असं म्हणू नका असं म्हणत उपस्थितांमध्ये हशा पिकवला.
राष्ट्रवादीचे अनेक नेते शरद पवारांच्या दैनंदिन कामाच्या आवाक्याचा उल्लेख करत शरद पवार अजूनही तरुण आहेत असं कौतुक करत असतात. त्याचाच धागा पकडत पवारांनी आपण अजूनही तरुण असल्याचा पुनरुच्चार केला.
आजचं सरकार हे शेतकऱ्यांच्या संदर्भात संवेदनशील सरकार नाही. आम्ही शेतकऱ्यांची 71 हजार कोटींची कर्जमाफी केली. मात्र आजच्या सरकारने फक्त कारखानदारांची कर्ज माफ केली आहेत. तुम्ही आणि मी एकत्र आलो तर यांना हकलवायला वेळ लागणार नाही. मग शेतकऱ्यांची कर्जमाफी कशी होत नाही ते मी बघतो असं असं म्हणत शरद पवारांनी सरसकट कर्जमाफीचं आश्वासन दिलं. जालन्यात कार्यकर्ता मेळाव्यात शरद पवारांनी शेतकऱ्यांना हे आश्वासन दिलं.
शरद पवारांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका केलीय. मोदी दिल्लीत कौतुक करतात आणि निवडणुकीत माझ्यावर टीका करतात, असं पवार म्हणाले आहेत. गेल्या ५२ वर्षांत मी एकदाही सुट्टी घेतली नाही, अशा माणसावर टीका करताना पंतप्रधानपदाचा आब राखा, असंही पवार यांनी म्हटलं आहे.