शरद पवारांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिदेंची भेट; पण कारण काय? चर्चांना उधाण

Sharad Pawar meets Eknath Shinde:राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर दाखल झाले होते. उद्धव ठाकरे कुटुंबासह सध्या देशाबाहेर असतानाच शरद पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी पोहोचले असल्याने चर्चांना उधाण आलं आहे.  

शिवराज यादव | Updated: Jun 1, 2023, 08:50 PM IST
शरद पवारांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिदेंची भेट; पण कारण काय? चर्चांना उधाण title=

Sharad Pawar meets Eknath Shinde: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या भेटीसाठी वर्षा (Varsha) बंगल्यावर दाखल झाले होते. या भेटीमागील कारण स्पष्ट होऊ शकलेलं नाही. मात्र या भेटीमुळे चर्चांना उधाण आलं आहे. शरद पवार अचानक एकनाथ शिंदे अचानक एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी पोहोचले असल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या भेटीमागे एखाद्या विषयावर चर्चा आहे की अन्य कोणतं राजकीय कारण आहे याबाबत चर्चा सुरु आहे. 

महत्त्वाचं म्हणजे महाविकास आघाडीत सहभागी असणारे उद्धव ठाकरे सध्या महाराष्ट्रात नाही आहेत. उद्धव ठाकरे कुटुंबासह सध्या देशाबाहेर असतानाच शरद पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी पोहोचले असल्यानेही या भेटीला एक वेगळं महत्त्व आलं आहे. दरम्यान, मंत्रिमंडळाचा अद्यापही न झालेला विस्तार तसंच ईडीकडून सुरु असलेली राष्ट्रवादीच्या नेत्यांची चौकशी या मुद्यावरही ही भेट असावी असे अंदाज आहेत.

राजकारणात काहीही होऊ शकतं - उदय सामंत

शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी या भेटीवर प्रतिक्रिया देताना राजकारणात काहीही होऊ शकतं असं सूचक विधान केलं आहे. झी 24 तासशी बोलताना ते म्हणाले की "यामागे कोणतंही राजकीय कारण नसावं. शरद पवारांनी चार वेळा मुख्यमंत्री म्हणून काम केलं आहे. सध्याचे विद्यमान मुख्यमंत्री सर्वांचं ऐकून, सल्ला घेऊन काम करणारे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे या भेटीत महाराष्ट्राच्या विकासात्मक गोष्टींवर, चर्चां झाली असावी. त्यासंदर्भात ही भेट आली असावी". 

"शरद पवार मोठे आणि अनुभवी नेते आहेत. त्यामुळे त्यांच्याबाबत काही अंदाज लावण्याइतका मी मोठा नाही. पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सर्वांचं ऐकून योग्य कारवाई करतात, म्हणून या भेटीकडे मी सकारात्मकपणे पाहतो. जो मुख्यमंत्री काम करत असतो, लोकांमध्ये जात असतो त्याच्याकडूनच लोकांना अपेक्षा असतात. त्यामुळेच शरद पवारांनी एकनाथ शिदेंची भेट घेतली असावी," असं उदय सामंत म्हणाले आहेत.  

"एकनाथ शिंदे सकारात्मकपणे काम करतात हे शरद पवारांना माहिती आहे. ज्या मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा असतात, जे त्या अपेक्षा पूर्ण करु शकतात त्यांचीच भेट घेतली जाते. आणि शरद पवार राजशिष्टाचार मानणारे नेते आहेत. या भेटीत विकास, सहकार क्षेत्रावर चर्चा झाली असावी. यामागे राजकीय कारण नसावं, पण राजकारणात काहीही होऊ शकतं," असं सूचक विधानही त्यांनी केलं.