'हा भटकता आत्मा तुम्हाला...'; मोदींच्या 'भटकती आत्मा' टीकेला शरद पवारांचं जशास तसं उत्तर

Sharad Pawar On Modi Bhatakti Aatma Comment: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुण्यातील जाहीर सभेमध्ये केलेल्या विधानाचा आता निवडणुकीच्या निकालानंतर शरद पवारांनी खरपूस शब्दांमध्ये समाचार घेतला आहे. अहमदनगरमधील कार्यक्रमात पवारांनी या टीकेवरुन मोदींना सुनावलं.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jun 11, 2024, 07:39 AM IST
'हा भटकता आत्मा तुम्हाला...'; मोदींच्या 'भटकती आत्मा' टीकेला शरद पवारांचं जशास तसं उत्तर title=
जाहीर कार्यक्रमात दिलं उत्तर

Sharad Pawar On Modi Bhatakti Aatma Comment: राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक असलेल्या शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या 'भटकती आत्मा' टीकेवर पहिल्यांदाच जाहीरपणे भाष्य केलं आहे. मर्यादा ठेऊन टीका केली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करतानाच शरद पवारांनी मोदींकडून निवडणुकीच्या प्रचारसभेत करण्यात आलेल्या या उल्लेखाचा त्याचा शैलीमध्ये समाचार घेतला आहे. सोमवारी अहमदनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 25 वा वार्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळेस घेण्यात आलेल्या मेळाव्यामध्ये शरद पवार बोलत होते. शरद पवारांनी यावेळेस कार्यकर्त्यांना उद्देशून केलेल्या भाषणामध्ये अगदी पक्ष स्थापनेपासून ते रविवारी मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेण्यापर्यंतच्या अनेक मुद्द्यावर भाष्य केलं. यावेळेस पवारांनी मोदींनी केलेल्या टीकेलाही उत्तर दिलं. 

मोदींना बहुमतं आहे का?

"मोदींनी शपथ घेतली मात्र त्यांना बहुमत होतं का? त्यांनी तेलगू देसम आणि बिहारच्या मुख्यमंत्र्यांचं समर्थन घ्यावं लागलं. निवडणूक प्रचारात त्यांचं भाषण होतं मोदी की गॅरंटी! लोकांनी दाखवून दिलं मोदी की गॅरंटी नाही. आता मोदी सरकार नाही एनडीएचं सरकार आहे," असा टोला शरद पवारांनी पंतप्रधान मोदींना लागावला. मोदींनी 'भटकती आत्मा' म्हणत केलेल्या टीकेलाही पवारांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिलं. पवार काय म्हणाले जाणून घेण्याआधी मोदींनी नेमकं काय म्हटलेलं पाहूयात...

मोदी 'भटकती आत्मा'वरुन नेमकं काय म्हणालेले?

पंतप्रधान मोदींनी 29 एप्रिल रोजी पुण्यात महायुतीच्या 4 उमेदवारांसाठी प्रचारसभा घेतली होती. या सभेतील भाषणामध्ये मोदींनी शरद पवारांचा 'भटकती आत्मा' असा उल्लेख करत निशाणा साधलेला. "महाराष्ट्राने दिर्घकाळ राजकीय अस्थिरतेचा काळ पाहिला आहे. मी जे बोलतोय ते कोणी व्यक्तिगत घेऊ नका. आमच्याकडे म्हणतात, काही भटकत्या आत्मा असतात. ज्यांच्या इच्छा पूर्ण होत नाहीत, ज्यांची स्वप्नं पूर्ण होत नाहीत त्या आत्मा भटकत राहतात. स्वत:चं नाही झालं तर इतरांचं बिघडवण्यात त्यांना मजा येते. आपला महाराष्ट्रही अशा भटकत्या आत्म्यांना बळी पडला आहे. 45 वर्षांआधी येथील एका मोठ्या नेत्याने आपल्या महत्त्वकांक्षेसाठी या खेळाची सुरुवात केली," असं म्हणत मोदींनी थेट उल्लेख न करता शरद पवारांना टोला लगावला होता. "तेव्हापासून (मागील 45 वर्षांपासून) महाराष्ट्रात अस्थिरतेचं राजकारण सुरु आहे. अनेक मुख्यमंत्री आपला कार्यकाळ पूर्ण करु शकले नाहीत. ही आत्मा काहीही करते. विरोधकांनाही तिने अस्थिर केलं आहे. ही आत्मा आपल्या पक्षाला आणि कुटुंबालाही अस्थिर केलं आहे. 1995 महायुती सरकारवेळीही या आत्माने सरकारला अस्थिरत करण्याचा प्रयत्न केला," असंही मोदींनी यावेळी म्हटलं होतं. आता पवारांनी या टीकेला थेट मोदींचा उल्लेख करतच उत्तर दिलं आहे.

नक्की वाचा >> मोदी भटकती आत्मा कोणाला म्हणाले? अजित पवार म्हणतात, 'मी त्यांना विचारेन, तुम्ही हे..'

भटकती आत्मा टीकेवरुन पवारांचं प्रत्युत्तर

"आम्ही राजकीय पक्ष म्हणून एकमेकांवर टीका करतो. पण टीका करताना सुद्धा काही मर्यादा ठेवतो. काय बोलले मोदी.. माझ्या बाबतीत बोलले. माझ्या बाबतीत विधान काय तर हा भटकता आत्मा आहे. माझा त्यांनी असा उल्लेख केला की हा भटकता आत्मा आहे. एका दृष्टीनं बरं झालं. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आत्मा हा कायम राहतो. हा कायम राहाणारा आत्मा तुम्हाला सोडणार नाही. कारण तो कायम त्याठिकाणी राहणार आहे," असं शरद पवार म्हणाले. 

मुस्लिमांसंदर्भातील विधानावरुनही टोला

"पंतप्रधान पदावरील व्यक्ती हा एका पक्षाचा नसतो सर्व देशाचा असतो. पण ते हे विसरले की हा देश मुस्लिमांचाही आहे. हा देश ख्रिश्चनांचाही आहे. एका भाषणात म्हणाले काही घरात जास्त मुलं जन्माला येतात. त्यांचा रोख मुस्लिमांकडे होता. त्यांच्या हातात सत्ता गेली तर तुमचं कुंकू राहणार नाही," असं पवार भाषणामध्ये म्हणाले.

3 महिन्यात जनतेनं सत्ता हाती दिली

"25 वर्षांपूर्वी या पक्षाची स्थापना केली. राज्यातील कानाकोपऱ्यात जाण्याचं ठरवलं 3 महिन्यात राज्यातील जनतेनं सत्ता देऊन सेवा करण्याची संधी दिली," असं शरद पवार म्हणाले.