अजित पवारांचा हा वैयक्तिक निर्णय, पवारांचे ट्विट

 शरद पवार यांनी ट्वीट करुन यासंदर्भात माहिती दिली आहे. अजित पवारांचा हा वैयक्तिक निर्णय असल्याचे पवार म्हणाले. 

Updated: Nov 23, 2019, 09:39 AM IST
अजित पवारांचा हा वैयक्तिक निर्णय, पवारांचे ट्विट  title=

मुंबई : राष्ट्रवादी नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भाजपासोबत गेली का ? अशी चर्चा सुरु झाली. पण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार यांच्या राजकीय निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पाठिंबा नाही असे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. शरद पवार यांनी ट्वीट करुन यासंदर्भात माहिती दिली आहे. अजित पवारांचा हा वैयक्तिक निर्णय असल्याचे पवार म्हणाले. 

तसेच राष्ट्रवादी नेते प्रफुल्ल पटेल यांनी देखील माध्यमांना यासंदर्भात माहिती दिली आहे. अजित पवारांचा हा वैयक्तिक निर्णय आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शरद पवार यांचा या सर्वाला पाठींबा नसल्याचे प्रफुल्ल पटेल यांनी म्हटले आहे. 

शरद पवारांना या सर्व गोष्टीची कल्पना नव्हती याची खात्रीदायक माहिती राष्ट्रवादीच्या सुत्रांकडून मिळत आहे.त्यामुळे शरद पवार हे सर्व आमदारांना फोन करत आहेत.  राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल हे देखील सिल्व्हर ओकवर पोहोचले आहेत.  कोणते आमदार अजित पवारांच्या संपर्कात आहेत याची चाचपणी केली जात आहे. अजित पवारांनी घेतलेला हा निर्णय काँग्रेस-शिवसेनेच्या नेत्यांना धक्का मानला जात आहे.  

राज्यात राष्ट्रपती शासन आले. एक खिचडी होण्याचा प्रकार सुरु होता. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजित पवार यांनी आम्हाला समर्थन दिले. अन्य काही नेत्यांनीही आम्हाला पाठींबा दिला. राज्यपाल आम्हाला बहुमत सिद्ध करण्यासाठी पत्र देतील आम्ही बहुमत सिद्ध करु असा विश्वास मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. 

महाराष्ट्रासमोर जी आव्हाने आहेत त्याचा सामना आम्ही समर्थपणे करु, शेतकऱ्यांच्यामागे खंबीरपण उभे राहण्याचे काम आम्ही करु. खरं वचन आम्ही जनतेला दिले होते. पण या वचनाचा भंग झाला आणि आमच्याऐवजी दुसऱ्यांसोबत जाण्याचा प्रकार झाला असा टोला त्यांनी शिवसेनेला लगावला.