विधान परिषदेच्या निवडणुका लागल्या असतांना मुंबईत शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांची गुप्त झाल्याने राजकीत वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. विशेष म्हणजे या बैठकीला हिंगोलीचे पालकमंत्री अब्दुल सत्तारदेखील उपस्थित होते. अब्दुल सत्तार यांच्या मुंबई येथील बंगल्यावर सदर बैठक झाल्याची सूत्रांची माहिती आहे.
निवडणुकी दरम्यान खासदार नागेश पाटील आष्टीकर आणि संतोष बांगर यांनी एकमेकांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती. पण निवडणुकीनंतर हे नेते एकत्र आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या बैठकीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तसंच या भेटीमागे नेमकं काय दडलं आहे याची चर्चा रंगली आहे.
संतोष बांगर यांनी 'झी 24 तास'शी संवाद साधताना मात्र या भेटीमध्ये कोणतीही चर्चा झालेली नसल्याचं सांगत सर्व दावे फेटाळले आहेत. "आमच्यात कोणतीही चर्चा झालेली नाही. योगायोगाने ही भेट झाली. हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या चेंबरमध्ये बसलेलो असताना तेही तिथे आले. यावेळी आम्ही चहा घेतला आणि ते काम संपल्यानंतर निघून गेले," असं संतोष बांगर यांनी सांगितलं आहे. चर्चांना उधाण आलेलंच असतं. पण आमच्यात कोणत्याही प्रकारची राजकीय चर्चा झालेली नाही असं ते म्हणाले.
दरम्यान निवडणुकीवेळी एकमेकांवर खालच्या पातळीवर करण्यात आलेल्या टीकेनंतर वादावर पडदा पडला आहे का? असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, "राजकारण राजकारणाच्या ठिकाणी आणि मैत्री मैत्रीच्या जागी असते. आम्ही याआधी एकत्र काम केलं आहे. आम्ही आमचं आणि त्यांनी त्यांचं काम केलं. आणि आता भेटल्यानंतर चहा घेतला". या भेटीचा कोणताही अर्थ काढण्याची गरज नसल्याचं त्यांनी अधोरेखित केलं आहे.