Shirdi : साईबाबा संस्थानबाबत (Shirdi Saibaba Trust) गेल्या काही दिवसांपासून चुकीच्या अफवा पसरवल्या जात आहे. या विरोधात साईसंस्थान कडक पाऊलं उचलणार आहे. शिर्डी पोलिसांकडे (Shirdi) संस्थानच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून लवकरच दोषींवर कारवाई करण्यात येणार आहे. सबका मालिक एक आणि श्रद्धा सबुरीचा संदेश देणाऱ्या साईबाबांच्या दरबारात सर्व जाती-धर्माचे भक्त हजेरी लावतात. साईबाबांच्या दरबारात जात धर्म मानले जात नाही.
पण, सध्या काही लोक साईबाबांना विशिष्ट धर्माशी जोडण्याचा प्रयत्न करीत आहे. काही दिवसांपूर्वी साई बाबा संस्थानने एका विशिष्ट समुदायाला मोठी रक्कम दान दिल्याबद्दल एक व्हॉट्सअॅप पोस्ट (WhatsApp Post) प्रसारित करण्यात आली होती. त्यानंतर उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या होत्या. पण, आता साई बाबा संस्थानने चुकीची माहिती पसरवणाऱ्या लोकांविरोधात कडक पाऊले उचलली आहेत. साईबाबा संस्थानची बदनामी करणाऱ्यांविरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात संस्थानच्याकडून गुन्हा दाखल करण्यात आलाय. याप्रकरणी पोलिसांनी आणि सायबर क्राईम (Cyber Crime) विभागाने तपास सुरू केला आहे. भाविकांनी समाजमाध्यमांवर फिरणाऱ्या मेसेजवर विश्वास ठेऊ नका असे आवाहन साईसंस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी शिवा शंकर यांनी केलंय.
साईबाबांच्या चरणी भरभरून दान
साईबाबांच्या चरणी भाविकांनी भरभरुन दान दिलं आहे. सुट्टीच्या कालावधीत आलेल्या भक्तांनी कोट्यवधीचं दान दिलं आहे. 25 एप्रिल ते 15 जुन दरम्यान साईदर्शनाला लाखो भाविकांनी हजेरी लावली. यातून गेल्या दिड महिन्यात तब्बल 47 कोटींचं दान जमा झालं आहे. यात देणगी कांऊटरवर 26 कोटीं, दक्षिणापेटीत 10 कोटी अर्पण करण्यात आले आहेत. डेबिट कार्ड, ऑनलाईन डोनेशन आणि इतर माध्यमातूनही कोट्यवधी रुपये जमा झाले आहेत. याशिवाय गेल्या दिड महिन्यात सव्वा कोटींचं सोनं आणि 28 लाखांची चांदी अर्पण करण्यात आली आहे. तर सशुल्क आरती आणि सशुल्क दर्शन पासच्या माध्यमातून 11 कोटींचं उत्पन्न साईबाबा संस्थानला झालं आहे.
याकाळात 22 लाख 41 हजार भक्तांनी भोजन प्रसादाचा लाभ घेतला आहे. 21 लाख 9 हजार भक्तांनी मोफत तर 4 लाख 23 भक्तांनी पेड दर्शन घेतलं आहे. 70 हजार 578 भक्तांनी पेड आरतीचा लाभ घेतला.
पुणे-शिर्डी पालखी सोहळा
श्री साईबाबा पालखी सोहळा समितीच्यावतीने आयोजित पुणे ते शिर्डी पायी पालखी सोहळ्याला आज पासून सुरुवात झाली. यंदा या सोहळ्याचं 35 वं वर्ष आहे. कसबा गणपती मंदिरापासून कर्नाटकमधील हनुमान जन्मभूमीचे मठाधिपती महंत परमपूज्य विद्यादास महाराज यांच्या हस्ते आरती करून या पायी पालखी सोहळ्याला सुरुवात करण्यात आली. यावेळी बीव्हीजी इंडियाचे हनुमंतराव गायकवाड आणि त्यांच्या पत्नी वैशाली गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
कसबा गणपती पासून पालखीच प्रस्थान झाल्यानंतर साई पालखीवर हेलिकॅप्टर मधून पुष्पवृष्टी करण्यात आली. गेली 35 वर्षे गुरुपौर्णिमेनिमित्त हा पालखी सोहळा आयोजित केला जातो. यामध्ये हजारो साई भक्त सहभागी होतात. पायी पालखी सोहळ्या दरम्यान समितीच्या वतीने व्यसनमुक्तीसाठी प्रबोधन केले जाते