शिर्डी : साईबाबांच्या शिर्डीत दहशतवाद्यानं रेकी केल्याची माहिती समोर येत आहे. सूत्रांनी ही माहिती दिलीय. गुजरात एटीएसने अटक केलेल्या दहशतवाद्याने ही कबुली दिलीय. शिर्डीचे मूळ रहिवासी आणि सध्या दिल्लीत असलेले एका हिंदी चॅनेलचे संपादक सुरेश चव्हाणके यांच्या शिर्डीतल्या घराची रेकी केल्याची कबुली दहशतवाद्याने दिली आहे.
दुबईत या दहशतवाद्यांना अटक झाली होती. मौलाना शब्बीर पठाण, अयुब झबरावाला, मौलाना गनी उस्मानी यांनी चव्हाणके यांच्या शिर्डी इथल्या घराची रेकी केली होती. या दहशतवाद्यांचे पाकिस्तानातल्या दहशतवादी संघटनेशी संबंध आहेत. या प्रकरणात सहा मौलवींसह आठ जणांना अटक करण्यात आलीय.
शिर्डी साईमंदिराला धमकीचं निनावा पत्र आणि मेल आले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. याआधीही साईमंदिर संस्थानला धमकीचा मेल आला होता. त्यामुळे आता या घटनेने शिर्डीत चिंतेचं वातावरण आहे.