शिर्डी : शिर्डीच्या साई संस्थान कडून राज्यातील दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी ५० कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. हा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा करण्यास राज्य सरकारनं देखील मंजुरी दिली आहे. हा निधी देण्यावरून साई संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे यांच्या गाडीवर हल्ला झाला होता. काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी हा हल्ला केला होता. मात्र आता निधी द्यायला कुणाचाही विरोध नाही, असं हावरे यांनी स्पष्ट केलंय. त्याशिवाय नगर जिल्ह्यातील निळवंडे धरणाला ५०० कोटींचे बिनव्याजी कर्ज देखील साई संस्थानच्या वतीनं देण्यात येणाराय. त्यामुळंच विरोध शमल्याचं हावरेंनी स्पष्ट केलं.
साई संस्थान आणि गोदावरी-मराठवाडा सिंचन विकास महांमंडळाने यासाठी सहमती पत्रावर स्वाक्षरी केली आहे.
या सिंचन प्रकल्पाचं काम गेल्या काही महिन्यांपासून बंद पडून आहे. या प्रकल्पाची एकूण किंमत १२०० कोटी असून संस्थेतर्फे प्रकल्पासाठी ५०० कोटीची मदत देण्यात आल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
सिंचन प्रकल्पासाठी साई संस्थानने राज्य सरकारला बिनव्याजी 500 कोटीचं कर्ज दिलयं.
हे कर्ज अहमदनगरातील सिंचन प्रकल्प पुर्ण करण्यासाठी दिलं असून हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर अहमदनगरचा पाणी प्रश्न मार्गी लागेल.
निळवंडे इथल्या कालव्यासाठी साई संस्थानकडून मिळणाऱ्या या निधीला सरकारकडून हिरवा कंदील मिळालाय.
125 कोटींचा पहिला हप्ता गोदावरी महामंडळाकडे वर्ग होणार आहे. हा निधी गोदावरी,मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाकडे एक विशेष बाब म्हणून वर्ग करण्याबाबतचा निर्णय विधी व न्याय विभागाने जारी केलाय.