शिरूर ते छत्रपती संभाजीनगर... महाराष्ट्रात 205 किलोमीटरचा ग्रीनफिल्ड द्रुतगती मार्ग

Greenfield Expressway : राज्यभरात महामर्गांचे जाळे विकसीत केले जात आहे. या अंतर्गतच शिरूर ते छत्रपती संभाजीनगर असा ग्रीनफिल्ड द्रुतगती मार्ग  उभारला जाणार आहे. 

वनिता कांबळे | Updated: Sep 24, 2024, 12:05 AM IST
शिरूर ते छत्रपती संभाजीनगर... महाराष्ट्रात  205 किलोमीटरचा ग्रीनफिल्ड द्रुतगती मार्ग  title=

Pune – Aurangabad Greenfield Expressway : महाराष्ट्रात  205 किलोमीटरचा ग्रीनफिल्ड द्रुतगती मार्ग तयार केला जाणार आहे. शिरूर ते छत्रपती संभाजीनगर असा हा मार्ग असमार आहे.  सार्वजनिक बांधकाम विभागाने या महामार्गास मंजूरी दिली आहे. राज्य मंत्रीमंडळ बैठकीत याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. या नव्या महामार्गामुळे शिरूर ते छत्रपती संभाजीनगर अंतर कमी होवून प्रवास जलद होणार आहे. यामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रीमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत शिरूर ते छत्रपती संभाजीनगर या नवीन ग्रीनफिल्ड द्रुतगती मार्गास मंजुरी देण्यात आली. शिरूर ते छत्रपती संभाजीनगर या  ग्रीनफिल्ड द्रुतगती मार्गासाठी 14हजार 886 कोटींचा खर्च अपेक्षित आहे.  205 किलोमीटरचा हा मार्ग असणार आहे. या मार्गाचे काम बीओटी तत्वावर करण्यात येईल आणि काम पूर्ण झाल्यानंतर 2008च्या पथकर धोरणानुसार वाहनांवर पथकर लावण्यात येईल. या मार्गासाठी 2हजार 633 हेक्टर जमीन भूसंपादित करण्यात येईल.

नागपूर ते पुणे प्रवास आठ तासात 

नागपूर ते पुणे प्रवास आठ तासात शक्य होणार आहे. तशी घोषणाच केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी केली होती. मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला छत्रपती संभाजीनगरजवळ नवीन प्रस्तावित पुणे - संभाजीनगर एक्सेस कंट्रोल ग्रीन एक्सप्रेस-वे नी जोडण्यात येईल. हा महामार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाद्वारे संपूर्ण नवीन अलाईंमेंट घेऊन तयार करण्यात येईल. यामुळे पुणे - संभाजीनगर प्रवास अडीच तासांत आणि नागपूर - संभाजीनगर प्रवास साडेपाच तासांत करता येणे शक्य होणार आहे असे गडकरी यांनी सांगितले होते.