नवी दिल्ली: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पंढरपुरात वारकऱ्यांच्या गर्दीत साप सोडणार, ही माहिती मिळाली होती. ही माहिती मिळाल्यानंतर फडणवीसांनी साप सोडणाऱ्यांचा बंदोबस्त करण्याची धमक का दाखवली नाही, असा सवाल शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी उपस्थित केला.
औरंगाबादमधील आंदोलनादरम्यान सोमवारी काकासाहेब शिंदे यांचा मृत्यू झाला होता. शिंदे यांच्या बळी जाण्यामागे सरकारची बेफिकरी आणि दुर्लक्ष कारणीभूत आहे. आता सरकार आर्थिक मदत देऊन त्याची भरपाई करु पाहत असेल, तर त्यासारखी निष्ठूर गोष्ट नाही, अशी टीकाही यावेळी राऊत यांनी केली.
तर दुसरीकडे शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनीही मराठा आरक्षण आंदोलनाबाबत काही शंका उपस्थित केल्या. या आंदोलनाला शिवसेनेचा पाठिंबा आहे. मात्र, काकासाहेब शिंदे यांच्या अंत्ययात्रेला आलेले खासदार चंद्रकांत खैरे यांना झालेला धक्काबुक्की पाहता या आंदोलनात अपप्रवृत्तींनी शिरकाव केल्याची शंकाही शिवाजीराव आढळराव पाटील यांनी व्यक्त केली.