मराठवाड्यात युतीला मोठे यश, मंत्रिमंडळात वर्णी लागण्यासाठी यांची जोरदार फिल्डींग

मराठवाड्यातून युतीला भरभरून कौल मिळाला आहे.  अनेक जण मंत्रिमंडळात स्थान मिळवण्यासाठी फिल्डींग लावत आहेत.

Updated: Oct 29, 2019, 02:33 PM IST
मराठवाड्यात युतीला मोठे यश, मंत्रिमंडळात वर्णी लागण्यासाठी यांची जोरदार फिल्डींग title=
संग्रहित छाया

विशाल करोळे, औरंगाबाद : मराठवाड्यातून युतीला भरभरून कौल मिळाला आहे. भाजपला १६ जागांवर तर शिवसेनेला १३ जागांवर विजय मिळाला आहे. अनेकांनी सलग तिसऱ्यांदाही विजय मिळवलाय. त्यामुळे आगामी मंत्रिमंडळात वर्णी लागण्यासाठी सर्वांनीच फिल्डींग लावली आहे.  मराठवाड्यात युतीला भरभरून दान मिळाल्यावर आता अनेक जण मंत्रिमंडळात स्थान मिळवण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. इच्छुकांच्या यादीतलं पहिलं नाव आहे अतुल सावे. गेल्या मंत्रिमंडळात त्यांना उद्योग राज्यमंत्री म्हणून संधी मिळाली. पण ही संधी केवळ सहा महिन्यांसाठी संधी होती. औरंगाबाद शहरातून एकमेव भाजप आमदार असल्याने शिवसेनेवर वर्चस्व राखण्यासाठी सावेंना संधी मिळू शकते. 

गंगापूरचे भाजपा आमदार प्रशांत बंब यांचं नावही चर्चेत आहे. बंब यांची ही तिसरी टर्म आहे. गेल्यावेळी त्यांचं मंत्रिपद थोडक्यात हुकलं होतं. मात्र यावेळी त्यांच्याकडे प्रबळ दावेदार म्हणून पाहिलं जात आहे. औरंगाबाद पश्चिमचे शिवसेना आमदार संजय शिरसाठ यांचंही नाव चर्चेत आहे. गेल्यावेळी मंत्रिपद न मिळाल्याने ते नाराज होते. शपथविधीवरही त्यांनी बहिष्कार टाकला होता. पण यावेळी त्यांची दावेदारी प्रबळ मानली जातेय. 

पैठणचे शिवसेना आमदार सांदिपान भुमरे गेल्यावेळी मंत्रिपद न मिळाल्याने नाराज होते. यावेळी मात्र त्यांना मंत्रिपदाची अपेक्षा आहे. उस्मानाबादमध्ये राष्ट्रवादीतून भाजपात आणलेला मोठा चेहरा म्हणजे राणा जगजितसिंह. राष्ट्रवादी सोडताना भाजपाने त्यांना मंत्रिपदाचं वचन दिल्याची चर्चा आहे. तर शिवसेनेचे परभणीचे आमदार राहुल पाटील यांच्याही नावाची मोठी चर्चा आहे. आदित्य ठाकरेंचे जवळचे म्हणून त्यांची दावेदारीही प्रबळ मानली जातेय. 

मराठवाड्यातील काही नवे चेहरे आहेत. यांचे मंत्रिपदासाठी जोरदार लॉबिंग सुरू आहे. याखेरीज बबनराव लोणीकर आणि उस्मानाबादहून तानाजी सावंत यांचीही गेल्या सरकारमध्ये मंत्रिमंडळात वर्णी लागली होती. त्यांना यावेळीही संधी मिळेल, अशी चर्चा आहे. आता कोणाची लॉटरी लागते हे पाहणं औत्सुक्याचं आहे.