वयोवृद्ध आणि अंपग व्होटबँकवर शिंदे गटाची नजर, खासदारांना दिल्या महत्त्वाच्या सूचना

याच पार्श्वभूमीवर खासदार श्रीकांत शिंदे यांनी त्यांच्या लोकसभा मतदारसंघातील 38 हजारहून अधिक वृद्ध आणि अंपगत्व आलेल्यांची यादी बनवली आहे.

कपिल राऊत | Updated: Mar 22, 2024, 05:19 PM IST
वयोवृद्ध आणि अंपग व्होटबँकवर शिंदे गटाची नजर, खासदारांना दिल्या महत्त्वाच्या सूचना title=

Shivsena Loksabha Election 2024  : लोकसभा निवडणूक 2024 च्या तारखा जाहीर झाल्या आहेत. महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यात निवडणूक होणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली आहे. महाराष्ट्रात 26 एप्रिल, 7 मे, 13 मे, 20 मे आणि 25 मे मतदान होणार आहे. तसेच 26 विधानसभा जागांवर पोटनिवडणूक होणार असून यात महाराष्ट्रातील एका जागेचा समावेश आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. सध्या शिवसेना (शिंदे गट) पक्षाकडून मतदारांना आकर्षित केले जात आहेत. यासाठी शिवसेनेची नजर वयोवृद्ध आणि अंपग मतदारांवर आहे. 

यंदा प्रथमच ज्येष्ठ आणि दिव्यांग मतदारांना घरबसल्या मतदान करण्याची सुविधा दिली जाणार आहे. ज्या व्यक्तींचे वय 85 वर्षे आणि त्यापेक्षा जास्त आहे, त्या मतदारांच्या घरी जाऊन मतदान घेतले जाणार आहे, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. याच पार्श्वभूमीवर खासदार श्रीकांत शिंदे यांनी त्यांच्या लोकसभा मतदारसंघातील 38 हजारहून अधिक वृद्ध आणि अंपगत्व आलेल्यांची यादी बनवली आहे.

वयोवृद्ध आणि अंपग मतदारांवर शिवसेनेची नजर 

नुकतंच मुंबईतील वरळीतील डोम येथे पक्षाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत वृद्ध आणि अंपगत्व आलेल्यांची यादी कशी बनवावी, याचे मार्गदर्शन खासदारांना करण्यात आले. यावेळी त्यांनी सर्व शिवसेना खासदारांना आपापल्या लोकसभा मतदार संघातील वृद्ध आणि अपंग व्यक्तींची यादी बनवून घ्या, अशी सूचना खासदारांना दिली आहे. कारण या व्यक्तींची मतदारसंघातील ही मत विजयासाठी निर्णयात्मक ठरू शकतात, असेही श्रीकांत शिंदे यांनी म्हटले. 

याच अनुषंगाने त्यांच्याशी संपर्क वाढवा. ही मत मिळवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा आखा, अशी सूचना श्रीकांत शिंदे यांनी खासदारांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामुळे सध्या वयोवृद्ध आणि अंपग मतदारांवर शिवसेनेची नजर असल्याचे बोललं जात आहे. 

आणखी वाचा : यंदा प्रथमच मिळणार 'वोट फॉर्म होम' सुविधा, कोण करु शकेल घरबसल्या मतदान?

दरम्यान महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यात निवडणूक होणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली आहे. महाराष्ट्रात 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे, आणि 20 मे रोजी मतदान होणार आहे. तसंच 26 विधानसभा जागांवर पोटनिवडणूक होणार असून यात महाराष्ट्रातील एका जागेचा समावेश आहे.