धक्कादायक : नोव्हेंबरमध्ये 300 शेतकऱ्यांची आत्महत्या

शेतकरी आत्महत्यांच्या घटनेत वाढ 

Updated: Jan 3, 2020, 08:09 AM IST
धक्कादायक :  नोव्हेंबरमध्ये 300 शेतकऱ्यांची आत्महत्या title=

मुंबई : ज्यात एकीकडे सत्तेची रस्सीखेच सुरू असताना हवालदिल झालेला शेतकरी मात्र आपलं जीवन संपवत होता. राज्यात शेतकरी आत्महत्यांच्या घटनात कमालीची वाढ झाली आहे. गेल्या नोव्हेंबर महिन्यात राज्यात तब्बल ३०० शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे. 

गेल्या ४ वर्षात एकाच महिन्यात एवढ्या आत्महत्या होण्याचा हा पहिलाच प्रकार आहे. ऑक्टोबर महिन्यात आलेल्या अवकाळी पावसाने होत्याचं नव्हतं केलं. खरीपाचा ७० टक्के हंगाम उध्वस्त झाला. यानंतर लगेच या आत्महत्यांच्या घटना कमालीच्या वाढल्या.

महूसल खात्याच्या आकडेवारीनुसार ऑक्टोबर ते नोव्हेंबर या कालावधीत आत्महत्यांच्या घटना ६१ टक्कयांनी वाढल्या. ऑक्टोबर महिन्यात १८६ तर नोव्हेंबर महिन्यात ११४ आत्महत्या झाल्या. दुष्काळग्रस्त मराठवाड्यात सर्वाधिक म्हणजे १२० आत्महत्या झाल्या आहेत. तर नोव्हेंबरमध्ये विदर्भात सर्वाधिक म्हणजे ११२ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळलं आहे. 

या आकडेवारीने प्रत्येकाचं मन हेलावलं आहे. यंदाच्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना हवालदील केलं आहे. पहिल्यांदा शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच प्रमाण 300 वर गेलं आहे. देशाचा पोशिंदा असलेला शेतकरी असा हवालदील होऊन आत्महत्या करत असेल तर ही गंभीर बाब आहे. याकडे सरकारने लक्ष देण्याची गरज आहे. अवकाळी पावसाने सगळ्याच शेतकऱ्यांच नुकसान केलं आहे. गेल्या चार वर्षांत शेतकऱ्यांच्या आत्महत्येत लक्षणीय वाढ झाली आहे.